पोलिसांसाठी १० नवी शौचालये
By admin | Published: September 3, 2016 02:09 AM2016-09-03T02:09:51+5:302016-09-03T02:09:51+5:30
देशाच्या विकासासाठी अन्य गोष्टींप्रमाणेच स्वच्छता हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही सुरु
मुंबई: देशाच्या विकासासाठी अन्य गोष्टींप्रमाणेच स्वच्छता हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान राज्यातही सुरु करण्यात आले आहे. ‘माझा स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’च्या माध्यमातून राज्याला संपूर्ण स्वच्छतेकडे नेण्यासाठी सामाजिक संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जायंट इंटरनॅशनल आणि ‘आय लव्ह मुंबई’ या संस्थेच्या सहकार्याने ‘माझा स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शायना एनसी यांच्या पुढाकाराने मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयास १० शौचालये देण्यात आली आहेत. या शौचालयांच्या उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार राज पुरोहित, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, अभिनेत्री रविना टंडन आणि ‘क्लीन सीटी’चे आदर पुनावाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून राज्यात स्वच्छतेचे चांगले काम होत आहे. पंतप्रधानांनी नुकतीच देशातील १० स्वच्छ शहरांची घोषणा केली. यात ५ शहरे राज्यातील असून राज्यात ७ हजार गावेही संपूर्ण हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविताना जनतेलाही स्वच्छतेची सवय होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था तयार होणे गरजेचे असते. ही व्यवस्था शायना एन. सी. यांच्या संस्थेच्या माध्यमातून उभी राहत आहे.
आदर पुनावाला यांनी पुणे शहरात स्वच्छतेसाठी काम केले आहे. महाराष्ट्राला स्वच्छतेकडे नेण्यासाठी यांच्यासारख्या सामाजिक संस्थांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पोलीस दल आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी जागांची निश्चिती करावी. त्याठिकाणी सार्वजनिक संस्थाच्या माध्यमातून शौचालये उपलब्ध करुन घ्यावीत. या सार्वजनिक शौचालयांचा जनतेस लाभ होऊन स्वच्छता राहण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)