ठाकरेंचे २० पैकी १० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत; शिंदे गटाचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 13:02 IST2024-12-01T12:59:07+5:302024-12-01T13:02:56+5:30
एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहू ही शकत नाहीत. येत्या पाच तारखेला शपथ विधी होईल अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

ठाकरेंचे २० पैकी १० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत; शिंदे गटाचा मोठा दावा
महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. जे शेतात राहतात ते शेतात जातील, जे महालात राहतात त्यांना काय कळणार, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. तसेच याच ठाकरेंचे आता निवडून आलेल्या २० आमदारांपैकी १० जण आमच्याकडे यायला तयार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
याचबरोबर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा असल्या तरी एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहू ही शकत नाहीत. येत्या पाच तारखेला शपथ विधी होईल अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कोणतेही खाते मागणे यात गैर काहीच नाही. यात नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि निर्णय होईल.
आपल्या मंत्री पदाच्या आणि उप मुख्यमंत्री पदाच्या चर्चा होत असल्या तरी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी आपली इच्छा आहे. आपल्या मंत्री पदाच्या बाबत आपला नेता निर्णय घेईल, असेही पाटील म्हणाले.
शिवसेना मोठी झाली, त्यांच्या महालात आमचीही वीट आहे. त्या विटांना विसरले, संजय राऊत सारखा दगड त्यांनी आणला. या दगडाने सगळा सत्यानाश करून टाकला आहे. त्या व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी ओळखावे, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.