जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:43 AM2022-06-14T05:43:31+5:302022-06-14T05:44:04+5:30

राज्यसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महाविकास आघाडीला २० जून रोजी पुन्हा एकदा कसोटीला सामोरे जावे लागेल ते विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने.

10 seats 11 candidates in the vidhan parishad election | जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर 

जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर 

Next

 मुंबई :

राज्यसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महाविकास आघाडीला २० जून रोजी पुन्हा एकदा कसोटीला सामोरे जावे लागेल ते विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने. १० जागांसाठी ११  उमेदवार रिंगणात असल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडी व भाजप आमनेसामने आहेत. त्यातच या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने दोन्ही बाजूंचे टेन्शन वाढले आहे. 

भाजप समर्थित अपक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे या दोघांनी सोमवारी अर्ज मागे घेतला. भाजपने पाचवी जागा लढवू नये, अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केली. मात्र, काँग्रेसने दुसऱ्या जागेवर माघार घ्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दोघांनीही एकमेकांना प्रतिसाद न दिल्याने दहाच दिवसांच्या अंतराने पुन्हा एका निवडणुकीचे राजकीय थरारनाट्य होऊ घातले आहे.  

लहान पक्ष, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर
- राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या एकूण २९ आमदारांच्या मतांना प्रचंड महत्त्व असेल. 
-  शिवसेना सोडून सर्वच पक्षांना त्यांची मनधरणी करावी लागेल, असे दिसते. नाराज आमदारांची नाराजी महाविकास आघाडी सरकारकडून दूर करून त्यांना आपल्याकडे वळविले जाते की आधीपेक्षा जास्त आमदार भाजपला साथ देतात यावर निकालाचे अवलंबून असेल. 

राष्ट्रपतिपदासाठी शरद पवार अनुत्सुक 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बिगर भाजप पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी हालचाली सुरु आहेत. यासाठी चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे.  मात्र, शरद पवार हे राष्ट्रपतीपदाची  निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

असे आहेत उमेदवार
शिवसेना: सचिन अहीर, आमशा पाडवी.
राष्ट्रवादी : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे. 
काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप.
भाजप : प्रवीण दरेकर, 
राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड.

जगताप की लाड? 
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक जिंकणार की संजय पवार याविषयी उत्कंठा होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या मतांचे गणित बघता दहाव्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप जिंकणार की भाजपचे प्रसाद लाड बाजी मारणार अशी उत्कंठा राहू शकते.

कोणासाठी काय कठीण? 
शिवसेना : या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येण्यासाठी २७ चा कोटा आहे. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. 
राष्ट्रवादी : ५३ आमदार आहेत. राज्यसभेप्रमाणे अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मताधिकार न मिळाल्यास राष्ट्रवादीकडे ५१ आमदार उरतील. दोन उमेदवार निवडून तीन मतांची गरज असेल.
भाजप : स्वत:चे १०६ आमदार व ७ अपक्ष सोबत असल्याने आकडा ११३ आहे. चार आमदार निवडून येऊ शकतात, पण पाचवा आणण्यासाठी त्यांना १३५ मते लागतील. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. तेवढी कायम ठेवून त्यांना आणखी १२ मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. 
काँग्रेस : ४४ आमदार आहेत. २ उमेदवार निवडून आणायचे तर १० मते लागतील. हा झाला पहिल्या पसंतीच्या मतांचा हिशेब. मात्र, निवडणूक दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेली तर चित्र आणखी वेगळे होऊ शकते.

माझा चमत्कारावर विश्वास नाही पण महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यांच्या आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. ती आगामी निवडणुकीत उफाळून येण्याची शक्यता आहे. भाजप पाच जागा नक्कीच जिंकेल.    
 - देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते.

Web Title: 10 seats 11 candidates in the vidhan parishad election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.