१0 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी मिळतात १४ रुपये
By admin | Published: July 19, 2016 12:25 AM2016-07-19T00:25:08+5:302016-07-19T00:25:08+5:30
पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती.
गणेश मापारी /खामगाव (जि. बुलडाणा)
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथिने युक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत असला तरी या योजनेतून विद्यार्थ्यांंची थट्टाच चालविण्याचा प्रकार समोर येत आहे. पोषण आहार तयार करण्यासाठी १0 विद्यार्थ्यांमागे १४ रुपये ३0 पैसे अनुदान देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्या सोबतच विद्यार्थ्यांंनीही जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती द्यावी यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत. पहिली ते आठवी पर्यंंतच्या विद्यार्थ्यांंसाठी उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील शाळांना तांदुळा सोबतच इतर धान्याचा पुरवठा करण्यात येतो व सदर धान्य शिजविण्यासाठी लागणारे इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता शासनाकडून अनुदान दिल्या जाते. या अनुदानाच्या रकमेत नुकतेचा वाढ करण्यात आली आहे. आता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांंचा आहार बनविण्यासाठी प्रति विद्यार्थी १.४३ पैसे इतका खर्च देण्यात येतो. तर शहरी भागासाठी तयार आहार पुरवठा करणार्या संस्थांना प्रति विद्यार्थी ३ रुपये ६७ पैसे इतके अनुदान दिल्या जाते. अशाप्रकारे पहिली ते पाचवी पर्यंंतच्या जिल्हा परिषद शाळेच्या १0 विद्यार्थ्यांंसाठी १४ रुपये ३0 पैसे एवढय़ा तोकड्या स्वरुपाचे अनुदान देणे म्हणजे शासनाकडून मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांंची थट्टा चालविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. १४ रुपयांमध्ये एका विद्यार्थ्याचा आहार तयार होणे कठीण असतांनाही एवढय़ा रुपयात १0 विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्याच्या या योजनेच्या कल्पनेबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी मिळतात १ रुपया ९३ पैसे
शालेय पोषण आहार योजनेतून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांंंना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात यावा, असे निर्देश आहेत. या विद्यार्थ्यांंचा आहार तयार करण्यासाठी इंधन आणि भाजीपाला खरेदी करण्याकरिता प्रति विद्यार्थी १ रुपया ९३ पैसे अनुदान दिल्या जाते.