१० हजार जैन करणार सामूहिक उपवास
By admin | Published: September 12, 2015 02:14 AM2015-09-12T02:14:43+5:302015-09-12T02:14:43+5:30
‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा.
भार्इंदर : ‘मुंबई आमची असून तिच्या विकासात जैनांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे पर्युषण पर्वात १८ दिवस मांसविक्री व कत्तलखाना बंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करा. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जैन गौरव रक्षा समितीच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी भार्इंदर मधील १० हजार जैन सामुहिक उपवास व मंत्रजाप करणार आहेत,’ अशी माहिती आचार्य सागरचंद्र सागर सुरीश्वरजी महाराज यांनी बावन जिनालय जैन मंदिरातील पत्रकार परिषदेत दिली.
मीरा भार्इंदर महापालिकेच्या महासभेत भाजपाने कत्तलखाने बंदीचा ठराव केला होता. त्या विरोधात देशभरात पडसाद उमटले असुन शिवसेने पाठोपाठ मनसे, आरपीआय, बविआ, राष्ट्रवादी व काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मीरा भार्इंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर गीता जैन आदींची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. ‘बाळासाहेब ठाकरे व शिवसेने बद्दल सहानुभुती आहे. उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांनीच थेट जैन समुदायाला टार्गेट केल्याने
आम्ही देखील चकीत झालो
आहोत. भाजपाशी तुमचा काय
वाद असेल ते तुम्ही बघा, पण जैनांना टार्गेट का करता,’ असा सवाल सागरचंद्रजी यांनी केला. पक्षांच्या राजकारणात समाजाला ओढू नका, असे ते म्हणाले.
मुंबई आमची !
‘मुंबई ही कोणा एका जातीची नाही असे ते म्हणाले. आम्ही पण गणपती, जन्माष्टमी आदी वेळी सहकार्य करतो. या आधी ८ दिवस बंदीचे ठराव झाले. यंदा १८ दिवसांचा झाला. भाजपाचे २९ व अन्य सर्वांचे मिळून ६१ नगरसेवक असतानाही ठराव मंजूर झाला. दर दिवशी प्रत्येकी ३ हजार रुपये नुकसानभरपाई देतो व द्यायला तयार होतो, असे त्यांनी सांगितले.
शाकाहारी राहूनही जगता येते. जे आम्हाला समजून घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी उद्या प्रार्थना करणार असल्याचे सागरचंद्रजी यांनी सांगीतले. शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळात बावन जिनालय मंदिरा मागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उपवास व मंत्रजाप आदी केले जाणार आहे.