राज्यातील १० हजार कामगार दिल्लीवर धडकणार - कामगार किसान संघर्ष रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:40 AM2018-09-02T03:40:49+5:302018-09-02T03:41:06+5:30
केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून कामगार कायद्यात होणाऱ्या कामगारविरोधी बदलांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ५ सप्टेंबरला कामगार किसान संघर्ष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू)चे उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड म्हणाले की, सीटू किसानसभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने कामगार व शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी ५ लाख कष्टक-यांचा मोर्चा दिल्लीमध्ये काढण्यात येईल. पूर्वीच्या काँग्रेस आणि सध्याच्या भाजपाप्रणीत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी व कामगार मेटाकुटीस आले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने केंद्र व राज्य सरकारने पाळलेली नाहीत. त्यामुळे कामगार, शेतकरी, मजूर यांच्या सर्व प्रश्नांनी भीषण स्वरूप धारण केले आहे. याचाच जाब विचारण्यासाठी व कामगार कायद्यांतील बदलांविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात येईल.
रॅलीच्या माध्यमातून सध्याच्या कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कायद्यातील प्रस्तावित कामगारविरोधी व मालकधार्जिणे बदल रद्द करा, खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण मागे घ्या, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान वेतन व भत्ते द्या, आदी मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येतील. याशिवाय बेरोजगारांना काम, दरमहा ३ हजार निर्वाह भत्ता, बंद उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले जाईल. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा धरून आधारभूत भावाची हमी आदी मागण्यांसह शेतकरी, शेतमजूरही रॅलीत सामील होतील.
‘१० हजारांहून जास्त कामगार सहभागी होणार’
रॅलीच्या तयारीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांचे मेळावे घेऊन जागृती केली आहे. कामगार वर्गाच्या जिव्हाळ्याच्या ३६ प्रश्नांवर प्रचाराचे मुद्दे, ६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे किमान १० हजारांहून जास्त कामगार या मोर्चात सहभागी होण्याची आशा संघटनेने व्यक्त केली.