विदर्भात दोन महिन्यांत १० वाघांचा मृत्यू
By admin | Published: May 31, 2016 06:36 AM2016-05-31T06:36:18+5:302016-05-31T06:36:18+5:30
निम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे
गणेश वासनिक, अमरावती
निम लष्करी दलाच्या धर्तीवर विदर्भात वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र संरक्षण दल गठित करण्यात आले तरी वाघांच्या नैसर्गिक आणि भूकबळींचे सत्र कायम आहे. गत दोन महिन्यांत दहा वाघ मृत्यमुखी पडले आहेत. मात्र, व्याघ्र संरक्षण दलातील सुरक्षा रक्षकांना यापैकी एकही वाघ दिसू नये, ही बाब त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
केंद्र शासनाने वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षण
दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स)
स्थापन केले आहे. प्रारंभी पाच वर्षे
या संरक्षण दलावर केंद्र शासनाचे नियंत्रण राहणार असून त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात विदर्भातील वाघांची संख्या अधिक असून त्यांना शिकाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचे आव्हान या दलापुढे आहे. याशिवाय व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या परिसरात वन्यप्राण्यांचा
पायी मागोवा घेणे, वाघांचे सूक्ष्म नियोजन करणे, यशिवाय नैसर्गिक अधिवास समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करुन एकूणच वाघांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर
आहे. परंतु गत दोन महिन्यांत मेळघाटात दोन तर चंद्रपूर, बोर, गोंदिया, भंडारा आदी भागांत ७ ते ८ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दलाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्रत्येकी तीन, पेंच दोन तर नवेगाव बांध, नागझिरा येथे प्रत्येकी एक दल तयार करण्यात आले आहे. ताडोबात १२० तर मेळघाटात ८१ जवान या दलात कार्यरत आहेत.
अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेषाधिकार आहेत. या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्वर, वाहने, राहण्याची व्यवस्था, रजेचे नियोजन करण्यात आले आहे. या दलात स्थानिक आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे.