वर्षभरात १० कुमारी मातांचे लावले विवाह; ९२ मातांचे भवितव्य अंधारातच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:05 AM2018-11-21T02:05:09+5:302018-11-21T02:06:00+5:30
आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत.
यवतमाळ : आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. मात्र उर्वरित ९२ कुमारी मातांचा प्रश्न अजून तसाच आहे.
जिल्ह्यातील झरी जामणी, वणी, राळेगाव आणि पांढरकवडा भागातील कुमारी मातांच्या प्रश्नाने समाजमन सुन्न झाले आहे. येथे बहुतांश बंजारा समाजाची वस्ती आहे. शासनाच्या पुढाकारातून वर्षभरात १० कुमारी मातांच्या ‘पती’चा शोध लागला. यातील बहुतांश युवक गावातीलच असल्याची बाब पुढे आली. त्यांच्याशी चर्चा करून सामंजस्याने विवाह लावून देण्यात यश आले. या कुमारी मातांना आता अपले हक्काचे घर मिळाले आहे.
मात्र ९२ कुमारी मातांचे पती अजूनही बेपत्ता आहेत. यातील अनेक कुमारी मातांना त्यांच्या पतीचे नाव माहिती नाही. ते कुठे राहतात, काय करतात हेही माहीत नाही. कुमारी मातांचे माता पिताही निरक्षर आणि गरीब आहेत. त्यांना या प्रकरणात काय करायचे, कुणाकडे न्याय मागायचा, याची माहितीच नाही. यामुळे
अशा प्रकरणात तक्रारी दाखल
झाल्या नसल्याची माहिती सूत्रानी दिली.
एका गावात पाच कुमारी माता असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. या कुमारी माता वयाने लहान असून त्यांचे बाळ कुपोषित आहे. आपला आणि मुलाचा सांभाळ कसा करावा, हेदेखील त्यांना कळणे सध्या अवघड आहे. अनेक बालकांचे लसीकरणही झालेले नाही.
गरोदर मातांच्या
नोंदी घेण्याचे आदेश
आरोग्य विभागाच्या स्थानिक यंत्रणेच्या पुढाकारातून कुमारी मातांचा विवाह लावण्यात आला. आरोग्य सेविकांना गरोदर मातांच्या सर्व नोंदी घेण्याचे आदेश दिले आहे. अनेक कुमारी मातांचे पालक नाव लिहू नका असे म्हणतात. मात्र ट्रिटमेंट दिली जाते, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांनी दिली.