प्रेयसीच्या हत्या करणारा 10 वर्षांनंतर गजाआड
By admin | Published: January 21, 2017 09:52 PM2017-01-21T21:52:07+5:302017-01-21T21:52:07+5:30
फसवणूक करुन प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने एका सामाजिक कार्यकर्त्याला अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21- फसवणूक करुन प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने एका सामाजिक कार्यकर्त्याला अटक केली आहे. दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या हत्येला वाचा फोडण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
अर्चना दगडू सांगळे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष नंदकिशोर कातोरेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कातोरेविरुद्ध बेकायदा वेश्याव्यवसायाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा विविध शासकीय कार्यालयांमध्ये वावर होता.
तो मुळचा नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचा आहे. सूर्यप्रकाश फाऊंडेशन नावाची अशासकीय संस्था तो गेल्या दोन वर्षांपासून चालवीत आहे. अर्चना हिचे लग्न झालेले होते. परंतु पतीसोबत पटत नसल्याने ती वेगळी राहात होती. दरम्यान, संतोष आणि तिच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
दोघांच्या नावावर त्यांनी १५ डिसेंबर २००५ रोजी बाणेरमधील संस्कृती आंगण सोसायटीमध्ये एक सदनिका खरेदी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये रचना अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या वडीलांनी याबाबत चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर बनावट महिला उभी करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ही सदनिका त्याने स्वत:च्या नावावर अभिहस्तांतरीत करुन त्याची सप्टेंबर २०१४ मध्ये विक्री केली.
दरम्यान, त्याला अपहरणाचा गुन्ह्यात अटक करण्यात आली होती मात्र सबळ पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद गायकवाड यांना आरोपीने बनावट कागदपत्रे तसेच बनावट महिला उभी करुन सदनिका हस्तांतरीत केल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कातोरे याने अर्चनाला देवदर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरला नेऊन खून केल्याचे निष्पन्न झाले.
कोल्हापूरहून परत येताना त्याने दोन साथीदारांच्या मदतीने अर्चनाला हाताने मारहाण केली. तसेच गळा आवळून खून केल्यावर मृतदेह सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रगड किल्याजवळ टाकून दिला होता. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपी संतोष नंदकिशोर कातोरे