नराधमास १० वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: December 27, 2015 01:04 AM2015-12-27T01:04:42+5:302015-12-27T01:04:42+5:30
इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शाहनवाज शमसुद्दीन भडगावकर या कल्याण येथील तरुणाचे अपिल फेटाळताना स्वत:हून शिक्षा वाढवून उच्च न्यायालयाने
मुंबई: इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शाहनवाज शमसुद्दीन भडगावकर या कल्याण येथील तरुणाचे अपिल फेटाळताना स्वत:हून शिक्षा वाढवून उच्च न्यायालयाने त्याला १० वर्षांची सक्तमजुरी ठोठावली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी भादंवि कलम ३७६ (२) (एफ) मध्ये किमान १० वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तरीही कल्याणच्या सत्र न्यायालयाने शाहनवाजला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्याने केलेले अपील उच्च न्यायालयात सुनावणीस आले तोपर्यंत ही शिक्षा पूर्ण भोगून शाहनवाज गेल्या जुलैमध्ये तुरुंगातून बाहेरही आला होता. न्या. साधना जाधव यांनी अपील सुनावणीस घेतानाच त्याला शिक्षावाढीची नोटीस काढली आणि न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले. अपील फेटाळून न्या. जाधव यांनी त्यास लगेच ताब्यात घेतले आणि आणखी पाच वर्षांची सक्तमजुरी भोगण्यासाठी त्याची तुरुंगात रवानगी केली.
स्वाभिमानाने जगणे हा प्रत्येक स्त्रिचा मुलभूत हक्क आहे. बलात्काराने स्त्रिचे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होते. अशा परिस्थितीत कायद्याने ठरवून दिलेल्या किमान शिक्षेहून कमी शिक्षा देणे सर्वस्वी चुकीचे ठरते, असे न्या. जाधव यांनी नमूद केले. एवढेच नव्हे तर शाहनवाज याने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आता उर्वरित पाच वर्षांची शिक्षा भोगत असताना त्याला शिक्षेत कोणतीही सूट वा सवलत दिली जाऊ नये,असे निर्देशही त्यांनी दिले.
शाहनवाज हा चिकणघर, कल्याण (प.) येथे राहणारा आहे. समोरच्या चाळीत राहणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल त्याला ही शिक्षा झाली. गुन्हा घडला तेव्हा ही मुलगी एका कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता चौथीत शिकत होती. १५ नोव्हेंबर २०१० रोजी शाहनवाजने या मुलीला स्वत:च्या घरात बोलावून घेतले व मोबाईलवर आधी अश्लिल चित्रफिती दाखवून नंतर तिच्यावर बलात्कार केला होता. अपिलाच्या सुनावणीत आरोपीतर्फे अॅड. सुदीप पासबोला व अॅड. उमर काझी यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेट यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)
आजी करते सांभाळ
बलात्कार झालेल्या या मुलीच्या आई-वडिलांचे एड्सने निधन झाले आहे. होली क्रॉस शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करणारी आजी तिचा सांभाळ करते. तिचे आजोबा अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले असून त्यांना स्मृतिभ्रंशही झाला आहे.
ही मुलगीही एचआयव्ही बाधित असून तिच्यावर शीवच्या लो. टिळक रुग्णालयात त्यासाठी उपचारही सुरु आहेत.