माता न तू वैरिणी ! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाला संपवणाऱ्या आईला १० वर्ष तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 20:41 IST2018-11-02T20:35:52+5:302018-11-02T20:41:30+5:30
अनैतिक संबंधांत अडथळा ठरतोय म्हणून पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

माता न तू वैरिणी ! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाला संपवणाऱ्या आईला १० वर्ष तुरुंगवास
पुणे : अनैतिक संबंधांत अडथळा ठरतोय म्हणून पोटच्या अपंग मुलाला बॅटने मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला दहा वर्ष सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी हा आदेश दिला.
राखी तरूण बालपांडे (वय ४१, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी ) असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिने आपला १३ वर्षांचा मुलगा चैतन्य तरूण बालपांडे याला मारहाण केली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राखी ही उच्चशिक्षीत असून वाकड येथे एका कंपनीत एचआर म्हणून कार्यरत होती. राखी आणि तिच्या पतीत वाद होत असल्याने त्यांना घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. राखी बालपांडे ही घटनेच्या दोन वर्षापासून विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहत होती. त्यावेळी तिच्या घराचा मालक असलेल्या सुमित मोरे याच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते.
अपंग असल्याने चैतन्य कायम घरातच राहायचा. तर राखीच्या घरी सुमित व त्याच्या दोन मित्राचे येणे-जाणे होते. त्यामुळे तिला चैतन्यची अडचण होऊ लागली होती. त्यातूनच तिने आॅगस्ट २०१३ मध्ये बॅटने मारहाण करून त्याचा खून केल्याची तक्रार दाखल झाली होती. या खटल्यात जिल्हा सरकारी वकिल उज्वला पवार यांनी कामकाज पाहिले. चैतन्य हा केवळ १३ वर्षांचा होता. त्याने पूर्ण जगही पाहिले नाही. आईवर विश्वास असताना तिने अशा प्रकारचे कृत्य केले. त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला असल्याचा युक्तीवाद अॅड. पवार यांनी केला. त्यामुळे राखीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने राखीला खून प्रकरणी दोषी न धरता सदोष मनुष्यवध प्रकरणी शिक्षा सुनावली. तर तिचा साथीदार सुमित मोरे याच्या विरूध्द पुरावे न आढळल्याने त्याची न्यायालयाने मुक्तता केली.
राखीने केली होती दया दाखविण्याची मागणी : उपचारा दरम्यान पडल्याने मार लागून त्याचा मृत्यू झाला असा बचाव करण्यात आला होता. मात्र तपासाअंती चैतन्यला बॅटने मारहाण झाल्याचे समोर आहे. याप्रकरणी बचाव पक्षाने महिलेला दया दाखविण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र तिला शिक्षा सुनावण्यात आली.