शंभर टक्के एफआरपी देणाऱ्यांना गाळप परवान्यात प्राधान्य : साखर आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 01:28 PM2019-09-18T13:28:30+5:302019-09-18T13:31:15+5:30
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. ..
पुणे : आगामी गाळप हंगामासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के रक्कम दिलेल्या साखर कारखान्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी हंगामासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून, परवाना देताना या बाबी पाहिल्या जातील, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.
आगामी गाळप हंगाम येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होईल. त्यापूर्वी परवाने देण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालयाने सुरु केली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. तसेच, लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु होत्या. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचा नेमका आकडा हाती येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील, असे साखर आयुक्त म्हणाले.
राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीपूर्वी ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला होता. पुरामुळे गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेसह मळी, इथेनॉल, ब गॅस आणि कोजनचे उत्पादनही निम्म्याने घटेल असा अंदाज आहे. दरवर्षी साधारण ४४ ते ४५ लाख टन मळीचे उत्पादन होते. यंदा त्यात २० लाख टनापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे.
याबाबत माहिती देताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, आगामी गाळप हंगामासाठी दीड-दोन महिन्याचा कालावधी असला तरी परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. परवाना देताना ज्यांनी व्याजासह शंभरटक्के एफआरपी दिली त्यांचा प्राधान्याने विचार होईल. त्यानंतर शभंरटक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांना परवाना दिला जाईल. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांच्या परवाना वितरणाचे निकष ठरविण्यात येतील.
--------------------
ऊस नुकसानीचा अंदाज येण्यास सात दिवस लागतील
सांगली आणि कोल्हापूरला उसाचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज येण्यास अजूनही पाच ते सात दिवस लागतील. पुढील आठवड्यात साखर कारखान्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.