विमानतळासाठी १०० कोटी
By admin | Published: February 10, 2016 02:32 AM2016-02-10T02:32:10+5:302016-02-10T02:32:10+5:30
श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत
मुंबई : श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत (एमएडीसी) करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी १०० कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.
राज्य शासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यामार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या सुमारे २२० कोटींच्या निधीमधून सुमारे २०० कोटी रु पयांचा खर्च कंपनीने केला आहे. उर्वरित २० कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या कामांवर खर्च होणार आहेत, तसेच इतर कामांसाठी १०० कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करून विमानतळासाठी ३६४ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता आज देण्यात आली.
विमानतळाची उभारणी व विकासातील पहिल्या टप्प्यातील काही कामे पूर्ण झाली असून, इतर कामे मंजूर निधीतून करण्यात येतील. विमान वाहतुकीची भविष्यातील क्षमता, व्याप आणि क्षेत्र विचारात घेऊन, दुसऱ्या टप्प्यांतर्गत विमानतळाच्या धावपट्टीचे आकारमान २२०० मी. बाय ४५ मी. वरून ३२०० मी. इतके वाढविणे, टर्मिनल इमारतीची क्षमता वाढविणे, वाहनतळाची क्षमता वाढविणे, समांतर टॅक्सी-मार्गासाठी सुविधा उपलब्ध करणे, टर्मिनल इमारतीमध्ये बॅगेज स्क्रीनिंग मशीन, पॅसेंजर सिक्युरिटी चेक अरेंजमेंट, विंड डायरेक्शन इंडिकेटर इत्यादी सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
विमानतळाची उभारणी आणि विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे परीरक्षण व परिचालन करण्यासाठी विमानतळ कंपनीस स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे विमानतळ चालविण्यासाठी देण्यासही मान्यता देण्यात आली.
(विशेष प्रतिनिधी)
शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करणार
श्रीसाई शताब्दी वर्ष २०१७-१८ मध्ये साजरे होणार असून, त्यापूर्वी विमानतळाचे काम पूर्ण व्हावे, म्हणून ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी एवढे अनुदान मंजूर करून दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. विमानतळासाठी ३५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, इतर कामे घेण्यासाठी सुमारे २२ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य शिर्डी विमानतळास हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.