राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:00 PM2019-04-13T23:00:00+5:302019-04-13T23:00:01+5:30

राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे

100 lakh tunnes of sugar left in the state | राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

राज्यात शंभर लाख टन साखर शिल्लक

googlenewsNext
ठळक मुद्देमागणी घटली : यंदाही ५० लाख टन साखर राहणार पडून

पुणे : उत्तर भारतातील घटलेली मागणी, सलग दुसऱ्या वर्षी देशात साखरेचे भरगोस उत्पादन झाल्यामुळे बाजारात मालाला फारसा उठाव नसल्याने राज्यात सुमारे ९५ ते १०० लाख टन साखर पडून आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील राज्यात ५० लाख टन साखर शिल्लक राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
राज्यात १९५ कारखान्यांपैकी १७९ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. तर, ९४७.८७ लाख टन ऊस गाळपातून १०६ लाख ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामातही राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विक्रमी साखर उत्पादनामुळे राज्यात हंगाम सुरु होण्यापुर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर शिल्लक होती. 
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहिती नुसार राज्यात १५ फेब्रुवारी अखेरीस शिल्लक साखरेचे प्रमाण ११०.४३ लाख टनांवर होते. शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये केला. देशात एकसमान दर असल्याने उत्तरेकडील राज्यांंनी उत्तर प्रदेशातील साखर घेणे पसंत केले. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकमधून साखरेची मागणी कमी झाली. परिणामी राज्यातील काही कारखान्यांनी छुप्या पद्धतीने २९८० ते ३०२५ दरम्यान विक्रीस सुरुवात केली. 
मार्च महिन्यात देशासाठी २४ लाख टनांचा कोटा होता. मागणी घटल्याने केंद्र सरकारने एप्रिलसाठी १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला. कोटा कमी झाल्याने उत्तर प्रदेशाची साखर लवकर संपली. परिणामी उत्तर प्रदेशात साखरेच्या भावात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ होऊन ३२०० रुपये झाले. मे महिन्यात साखरेचा कोटा २० लाख टनांच्या आत जाहीर झाल्यास राज्यातील साखरेला मागणी वाढेल असे साखर क्षेत्रातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 
------------------
म्हणून साखरेला उठाव नाही

उन्हाळ्यामध्ये आईसक्रीम, शीतपेयांना मागणी असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होत असते. मोठ्या कंपन्या दोन महिने आधीच भविष्यात लागणाऱ्या मालाची खरेदी करीत असतात. अशी खरेदी करताना भावातील चढ उताराचाही अंदाज कंपन्यांकडून घेतला जातो. देशात मुबलक साखर असल्याचे स्पष्ट झाल्याने व्यापारी आणि मोठ्या कंपन्याही आवश्यकते प्रमाणेच साखर खरेदी करीत आहेत. साखरेचा साठा करुन त्यात पैसे गुंतवून ठेवले जात नाही. साखरेचा साठा बेताचा असल्यास भाववाढीची शक्यता गृहीत धरुन, जास्त खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल राहतो. त्यामुळे मागणीतही वाढ होत असते. 

 

 

 

Web Title: 100 lakh tunnes of sugar left in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.