अन्वेषचे गणितात १०० नंबरी यश
By admin | Published: May 3, 2017 04:10 AM2017-05-03T04:10:13+5:302017-05-03T04:10:13+5:30
‘गणित’ असे नुसते उच्चारले तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो आणि अनेक प्रौैढांच्या कपाळावर आठ्या पडतात
पूजा दामले / मुंबई
‘गणित’ असे नुसते उच्चारले तरीही अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा येतो आणि अनेक प्रौैढांच्या कपाळावर आठ्या पडतात. पण लहानपणापासून गणिताशी गट्टी असणाऱ्या मुंबईच्या अन्वेष मोहंतीने नुकत्याच लागलेल्या जेईई मेन परीक्षेत देशात ७७ वा क्रमांक पटकावला. उल्लेखनीय म्हणजे अन्वेषने गणितात १२० पैकी १२० गुण मिळवले आहेत. त्याच्या गणिताविषयीच्या ‘पॅशन’बद्दल त्याने ‘लोकमत’ला दिलखुलासपणे माहिती दिली.
चेंबूरच्या अणुशक्तीनगर येथे अन्वेष त्याच्या आई-बाबांसोबत राहतो. शाळेपासूनच अन्वेषला गणित आणि भौतिकशास्त्र विषयात विशेष रस होता. इयत्ता आठवीला असताना त्याला शिष्यवृत्तीही मिळाली होती. तेव्हापासूनच खरे म्हणजे गणित आणि भौतिकशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली.
अन्वेष म्हणाला, मी गोवंडीच्या स्वामी रामकृष्ण परमहंस ज्युनियर कॉलेजमध्ये होतो. पुढे मला आयआयटी मुंबईत कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. सध्या मी फक्त जेईई अॅडव्हान्स परीक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. आठवीत शिष्यवृत्ती मिळाल्याने मला गणित आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांत अधिक रस निर्माण झाला. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास मी अकरावीपासून सुरू केला आहे. अकरावीत आल्यावर मला भेटलेल्या काही शिक्षकांमुळे हे यश प्राप्त करणे शक्य झाले. गणिताचे जफर अहमद यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. आई-बाबांचा मला नेहमीच पाठिंबा असतो, असेही अन्वेषने स्पष्ट केले.
अनेक विद्यार्थ्यांना गणित या विषयाची भीती वाटत असल्याने तो नावडता विषय होतो. पण, ज्या गोष्टींची भीती वाटते, ज्या गोष्टी आवडत नाहीत अशा गोष्टींमध्ये स्वत:हून रस निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रगती होते.
दिवसाला मी सात ते आठ तास किमान अभ्यास करतो. अनेक वेळा मी दहा-दहा तासही अभ्यास केला आहे. माझा जेईई मेन परीक्षेचा अभ्यास मी आॅक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपवला होता. त्यानंतर गणिताची प्रॅक्टिस केली. विविध पुस्तकांतील विविध पद्धतींची गणिते मी सोडवत होतो. अनेक पेपर सोडवले होते. या परीक्षेत वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे असते.
सध्या मी फक्त अभ्यास करतो. पण शाळेत असताना विविध प्रकारची नाणी जमवण्याचा मला छंद होता. छंद जोपासणे व अभ्रूासातील सरावात सातत्या यामुळे यश मिळणे सहज शक्य आहे, असा सल्ला अन्वेषने विद्यार्थ्यांना दिला.
अन्वेषला मिळालेल्या शिष्यवृत्ती
दहावीच्या परीक्षेनंतर सरकारतर्फे घेण्यात येणारी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनाची (केव्हीपीवाय) शिष्यवृत्ती मिळाली आहे. केव्हीपीवायमध्ये ७३ वा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ‘नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन’ची शिष्यवृत्ती मिळाली आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्स आॅलिम्पियाडमध्ये सहभागी होऊन जिंकलो आहे.
घरातच शिक्षणाचा समृद्ध वारसा : अन्वेषचे वडील डॉ. रश्मीरंजन
मोहंती यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. केमिकलची कंपनी आहे, तर आई ज्योतिर्मय मोहंती या बीएआरसीमध्ये शास्त्रज्ञ आहेत.