देशातील १०० टक्के वाहने बॅटरी संचलित करणार : चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:13 PM2018-10-25T14:13:45+5:302018-10-25T14:21:02+5:30
इंधनाचे साठे मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे.
पुणे: देशातील १०० टक्के चार चाकी वाहने विद्यूत शक्तीवर चालणारी अशी करायची आहेत. एकदा बॅटरी चार्ज केली की वाहन किमान ४०० किलोमीटर गेले पाहिजे अशी क्षमता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील प्रवास अत्यंत स्वस्त होईल, असे ऊर्जामंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यासाठी देशभर चार्जिंग स्टेशन्सही तयार करण्यात येतील असे ते म्हणाले.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी व बाणेर येथील युथिका सोसायटी यांच्या वतीने सोसायटीमध्ये स्मार्ट सोलर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, आमदार मेधा कुलकर्णी, औंध बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अनिल किल्लोर, युथिका सोसायटीचे अध्यक्ष सुनित जोशी यावेळी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, इंधनाचे साठे आता मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे. राज्यात तसेच देशातही सर्वत्र ३६५ दिवसांपैकी ३२८ दिवस चांगला सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा वापर करून सौर उर्जा तयार करण्यात येत आहे. त्याचा खर्चही आता कमी झाला आहे. त्याशिवाय विद्यूत शक्तीवरील वाहनेही तयार होत आहे. भविष्यात त्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.
जगताप यांनी स्मार्ट प्रकल्पाची माहिती दिली. स्मार्ट सिटीमध्ये १० टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापासून तयार करणे अपेक्षित आहे. ते काम आता सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तीन कंपन्यांबरोबर सामंजस्य करारही करण्यात आला आहे. बालवडकर यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नागरिकांचा सकारात्मक सहभाग मिळेल अशी ग्वाही दिली.