अभिनेत्रीला दिली १०० रुपयांची खोटी नोट
By Admin | Published: October 19, 2016 02:03 AM2016-10-19T02:03:34+5:302016-10-19T02:03:34+5:30
रात्रीच्या सुमारास एका रिक्षावाल्याने मुंबईतील अभिनेत्रीच्या हातात १०० रुपयांची खोटी नोट टेकविल्याची घटना नुकतीच घडली.
मुंबई : रात्रीच्या सुमारास एका रिक्षावाल्याने मुंबईतील अभिनेत्रीच्या हातात १०० रुपयांची खोटी नोट टेकविल्याची घटना नुकतीच घडली. मेघा चक्रवर्ती असे अभिनेत्रीचे नाव असून, तिने ही बाब सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर चर्चा सुरू झाली आहे.
मूळची कोलकाता येथील रहिवासी असलेली मेघा मालाड परिसरात राहते. १५ आॅक्टोबरच्या रात्री तिने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. दरम्यान, रात्री १च्या सुमारास रिक्षातून उतरली. तेव्हा १०० रुपये भाडे झाल्याने तिने रिक्षावाल्याला पाचशे रुपये दिले. त्याने १०० रुपयांच्या चार नोटा परत केल्या. अंधारात तिने नोटा न पाहता तशाच ठेवल्या. सकाळी सामान घेण्यासाठी पाकिटामधून पैसे काढले तेव्हा नोटांमध्ये फरक असल्याचे जाणवले. त्या वेळी रिक्षावाल्याने आपल्याला खोटी नोट दिल्याचे समोर आले. रिक्षावाल्याने मोनोपॉली खेळातली नोट देऊन मेघा चक्रवर्तीला गंडवले. या नोटेवर ‘चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया’ असे लिहिले आहे. मेघाने हा प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. (प्रतिनिधी)