हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठी कोकणात १०० वर्षांचा करार
By Admin | Published: February 9, 2015 11:52 AM2015-02-09T11:52:13+5:302015-02-09T12:22:50+5:30
कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - धर्माच्या नावावर देशातील लोक एकमेकांना लक्ष्य करत असल्याचे पाहून गांधीजींना धक्का बसला असता, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे कान टोचले असतानाच कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे. मुंबईपासून २२८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील बुरोंडी गावातील नागरिकांनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आपापसांत १०० वर्षांचा करार केला आहे. सुमारे ४००० हजार नागरिकांची वस्ती असलेल्या या गावाने जातीय संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नागरिकांसाठी आचारसंहिताही आखली आहे.
या तीन पानी करारात अनेक कलमे टाकण्यात आली असून गावातील पवित्र धार्मिक स्थळांजवळून जातानाही ते नियम आचरण्यात आणावे लागतील असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 'गावातून हिंदू धर्मीयांतील नागरिकांची मिरवणूक निघाली असताना ते मशीदीजवळून जातानाही बँड वाजवू शकतात, मात्र त्याच वेळी नमाज सुरू असेल तर मशिदीपासून थोड्या अंतरावर मिरवमूक थांबवावी व नमाज पूर्ण झाल्यावरच पुढे जावे', असे एक कलम त्यात आले आहे.
तसेच दहीहंडीदरम्यान गोविंदा पथकातील तरूण गावातील मशिदीच्या परिसरातूनही उत्साहाने जातील आणि त्याचवेळी दर्ग्याला नमनही करतील. गावातील एका ठराविक क्षेत्रात राहणारे हिंदू नागरिक करजागाव दर्ग्याच्या वार्षिक उत्सवादरम्यान मदत करतील, असेही त्यात म्हटले आहे. दोन्ही धर्मांचे नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतील आणि त्यात सर्वांना सामावून घेतील.
गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही धर्मांतील नागरिक मंचावर उपस्थित असले पाहिजेत आणि दोन्ही धर्मांतील ज्येष्ट नागरिकांचा योग्य सत्कार व्हावा, असेही त्या करारात नमूद करण्यात आले आहे.
सध्या गावातील लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिक मुस्लिम असून नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दोन सदस्य हे मुस्लिम आहेत. कोकणतील इतर गावांप्रमाणेच बुरोंडीमध्येही जातीय सलोखा टिकून राहिला आहे. लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीजवळून जात असताना गाणी वाजवली गेल्यामुळे दोन्ही धर्मांच्या नागरिकांमध्ये १९८७ साली एकदाच संघर्ष निर्माण झाला होता.
त्यानंतर बराच काळ गावात शांतता होती. मात्र तीन वर्षांपूर्वी गोविंदा पथकाची मिरवणूक मशिदीसमोरून तीन वेळा गेल्याने पुन्हा एकदा गावात संघर्षाचे ठिणगी पडली होती. त्यानंतर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही हा १०० वर्षीय करार करण्याचा निर्णय घेतला, असे गावचे सरपंच प्रदीप राणे यांनी सांगितले.