गणेश मंदिरातील वटवृक्ष @ १०० वर्षे
By admin | Published: June 9, 2017 03:27 AM2017-06-09T03:27:48+5:302017-06-09T03:27:48+5:30
सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात.
जान्हवी मोर्ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात. नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत वृक्षवल्लींचा ऱ्हास होऊ लागला. त्याला डोंबिवली शहरही अपवाद नाही. मात्र, डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानातील वडाच्या झाडाला तब्बल १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील ८५ वर्षांपासून तो वटपौर्णिमेचा साक्षीदार आहे.
मोहन दातार यांनी सांगितले की, त्यांचे वडील शंकर दातार, लिखिते आणि कानिटकर यांनी १९१५ मध्ये गणेश मंदिराजवळ वडाचे झाड लावले. त्याला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या वडाच्या झाडाचे पूजन जवळपास ८५ वर्षांपासून आजपर्यंत सुरू आहे. डोंबिवलीतील विधवा महिला आंबूताई गोडबोले यांना मंदिराने पुरोहिताचे काम दिले होते. ही विधवा महिला मंदिराचे पौरोहित्य करत होती. त्या वेळी मंदिराकडून त्यांना दरमहा १० रुपये मानधन दिले जात होते. त्या काळी महिलांना पौरोहित्य करण्याचा अधिकार नव्हता. गणेश मंदिराने १०० वर्षांपूर्वी गोडबोले यांना तो अधिकार देऊन पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपली होती. १० रुपये मानधन मिळणाऱ्या खर्चातून गोडबोले या त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या. एका महिन्याची मानधनाची रक्कम व त्यात आणखी १५ रुपये टाकून त्यांनी जवळपास २५ रुपयांचा खर्च केला. या खर्चातून त्यांनी वडाशेजारी एक पार बांधून घेतला. त्याच पारानजीक मंदिरातील अनेक शुभकार्ये उरकली जात होती. गणेश मंदिरातील अनेक कार्यक्रम या पारावर होत होते. हा पार डोंबिवलीतील भक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा साक्षीदार आाहे. याच पारावर स्वरभास्कर भीमसेन जोशी व छोटा गंधर्व, राम मराठे यांच्या गाण्याच्या संगीत मैफली झाल्या आहेत.
१९७९ च्या आसपास गणेश मंदिराचे रूपडे पालटले. मंदिर चांगल्या प्रकारे बांधून घेण्यात आले. त्यामुळे पाराचे स्वरूप बदलले. मंदिरात सभागृह असल्याने आता कार्यक्रम पारावर होत नाहीत. मागच्या दिवाळीच्या सणाला पारावर किल्ल्यांचे प्रदर्शन भरवले होते. आता पथनाट्यांचे कार्यक्रम तेथे केले जातात. त्यामुळे जनजागृतीचा आधार असेही या वटवृक्षाला संबोधले जाते.
१०० वर्षांपूर्वी मंदिरातील दानपेटीत पाच रुपयांचे दान जमा होत होते. तसेच धान्यस्वरूपात दोन रुपये किमतीचे तांदूळ जमा होत होते. मंदिर संस्थानचा विकास होत गेला. नागरिकीकरण वाढले. मंदिराचा विस्तार झाला. त्यामुळे पाराची जागा कमी झाली. आता पाराखाली टाइल्स लावून ती जागा सुशोभित करण्यात आली आहे. रोज केर काढला जातो. ज्येष्ठ नागरिक त्याच्या सावलीत आपला फावला वेळ घालवतात. त्याच्या संध्याछायेच्या काळात हा वड त्यांच्या शिरावर सावली धरतो.
पतीला वटवृक्षाइतके आयुष्य लाभू दे
वडाच्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर असतात. ही मुळे पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे वड एक प्रकारे जलसंवर्धन करणारा वृक्ष आहे. तसेच तो दीर्घायुषी वृक्ष प्रकारात मोडतो. त्यामुळे त्याचे वयोमान १०० ते २०० वर्षे इतके असू शकते.
डोंबिवलीतील हा वटवृक्ष १०० वर्षांचा साक्षीदार झाला आहे. तो डोंबिवलीची ओळख बनला आहे. पूर्वी मंदिरातील कार्यक्रम याच पारावर झाले आहेत. हा वड अनेक कार्यक्रमांचाही साक्षीदार आहे.
डोंबिवलीतील महिला दरवर्षी वटपौर्णिमेला भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने या झाडाचे पूजन करतात. पतीचे आयुष्य वटवृक्षाच्या आयुष्याइतके व्हावे, अशी मनोकामना त्या करतात.