शंभरावे नाट्य संमेलन १०० गावांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:27 AM2019-02-25T05:27:51+5:302019-02-25T05:27:55+5:30

सांगलीतून सुरुवात; समारोपातही गज्वींच्या कानपिचक्या

100th Natya Sammelan in 100 villages | शंभरावे नाट्य संमेलन १०० गावांत

शंभरावे नाट्य संमेलन १०० गावांत

Next

- अजय परचुरे


नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन पुढच्या वर्षी १०० गावांमध्ये होणार असून, त्याची सुरुवात जानेवारी २०२० ला सांगलीतून होणार असल्याची घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी रविवारी नागपूरच्या ९९ व्या नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात केली. समारोपाच्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी उद्घाटनच्या वेळी केलेली शाब्दिक फटकेबाजी समारोपातही कायम ठेवली. सरकारला सूचक शब्दांत पण शाब्दिक टोचणी देत गज्वींनी कानपिचक्या दिल्या.


समारोपाच्या भाषणातही प्रेमानंद गज्वी यांनी शाब्दिक हल्ले कायम ठेवले. शहरी नक्षलवादाच्या प्रश्नाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ते निरसन केल्याने आपण हा मुद्दा मागे ठेवत आहोत हे त्यांनी जाहीर केले. आपल्या देशात सहिष्णूता आहे. राजकीय लोकांना मी माझा शत्रू मानत नाही मात्र जो प्रजेला सांभाळू शकत नाही तो राज्य सांभाळायला लायक नाही, अशी टीकाही केली. मराठी भाषेची वेदना समजून घेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागे केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.


विदर्भातील लोकांनी आपल्यावर अन्याय होतो, असे नेहमी म्हणू नये. अन्याय हा मुंबईतील लोकांवरही होतो. मी गुळाचा गणपती बनून वर्षभर नाट्य संमेलानाध्यक्ष बनणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. १०० ठिकाणी १०० वे नाट्य संमेलन करणार असाल तर त्या गावांत किमान नाटकांचे १०० प्रयोग करा, अशी सूचनाही त्यांनी नाट्य परिषदेला केला.


सांस्कृतिक मंत्री फिरकलेच नाहीत
संमेलनाकडे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी फिरवलेली पाठ, हा चर्चेचा विषय बनला होता. समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तावडे येणार, असे नाट्य परिषदेने जाहीर केले होते.


नागपूर पॅटर्न राबवा
९९ व्या नाट्य संमेलानचे प्रमुख स्थळ म्हणजे नागपूर महानगरपालिकेचे सुसज्ज सुरेश भट नाट्यगृह. पालिकेतर्फे नाट्यनिर्मात्यांकडून फक्त पाच हजार रुपये भाडे आकारले जाते. इतर महापालिकांनी नागपूर पॅटर्न राबवावा, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी केली.

Web Title: 100th Natya Sammelan in 100 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.