उसाच्या फडात १०२ बालकांचा जन्म!
By admin | Published: February 15, 2015 01:41 AM2015-02-15T01:41:18+5:302015-02-15T01:41:18+5:30
उसाच्या फडात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या १०२ गरोदार महिलांची श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात गेल्या चार महिन्यांत प्रसूती झाली.
पोटासाठी जीवनसंघर्ष : ओल्या बाळंतिणींचा वनवास कधी संपणार ?
बाळासाहेब काकडे - श्रीगोंदा
ऊसतोड कामगाऱ़़ पाठीवरच संसाराचं बिऱ्हाड... ऊसतोडीच्या कामासाठी दोन महिने एका वाडीवर, तर दोन महिने दुसऱ्या वस्तीवर असं त्यांचं आयुष्य... सोबत लेकरंबाळंही असतात. मात्र यात सर्वाधिक ससेहोलपट होते ती गरोदर ऊसतोड महिलांची. उसाच्या फडात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या १०२ गरोदार महिलांची श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात गेल्या चार महिन्यांत
प्रसूती झाली.
या ओल्या बाळंतिणी आपल्या बाळाला सांभाळतच ऊसतोड करीत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटला जात असताना हजारो ऊसतोड महिला कामगार अजूनही दुर्लक्षितच आहेत. त्यांना ना सकस आहार, ना शासनाची मदत! मुलाबाळांना घेऊन त्या १२-१२ तास राबतात.
श्रीगोंद्याच्या कुरुक्षेत्रात श्रीगोंदा, साईकृपा (हिरडगाव), कुकडी, साईकृपा (देवदैठण), वाळकी, दौंड शुगर, अंबालिका आदी कारखान्यांचे सुमारे ५ ते ७ हजार ऊसतोडणी मजूर आहेत. मोडलेल्या संसाराला उभारी मिळावी म्हणून सुमारे ३ हजार महिला आपल्या चिमुकल्यांना बरोबर घेऊन कष्ट उपसत आहेत. या कष्टकऱ्यांची मुलंही हातात लेखणीऐवजी कोयताच घेतलेली दिसतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांच्या प्रसूतीबाबत विशेष काळजी घेतली असून, प्रसूती झालेल्या सर्व महिलांना जननी शिशु सुरक्षा योजनेतून प्रत्येकी ७०० रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- डॉ. शैला डांगे, तालुका
वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा.