Nashik-Pune railway line : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी १०२३८ कोटींचे अर्थसहाय्य, राज्य शासनाने दिली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:41 AM2021-04-16T00:41:38+5:302021-04-16T07:15:56+5:30
Nashik-Pune railway line : केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदारी असेल. २३१ किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली जाणार आहे.
मुंबई : नाशिक - पुणे दुहेरी मध्यम अतिजलद (सेमी हायस्पिड) रेल्वे मार्गासाठी पुढील ११ वर्षांत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे राज्य शासनाने ठरवले असून, त्याबाबतच्या मान्यतेचा आदेश गुरुवारी काढण्यात आला.
केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदारी असेल. २३१ किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली जाणार आहे. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरावा, यासाठी या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य
देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
पहिल्या वर्षी ६१५ कोटी आणि त्यात दरवर्षी ८ टक्के वाढ करून दुसऱ्या वर्षी ६६५ कोटी, तिसऱ्या वर्षी ७१७ कोटी असे करत सातव्या वर्षी ९७७ कोटी आणि अकराव्या वर्षी १,३२८ कोटी इतका निधी राज्य शासन स्वत:च्या आर्थिक स्रोतांमधून देणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
पुणे - नाशिकरेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य...
- या मार्गावर असतील २४ रेल्वेस्थानके, १८ बोगदे.
- पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाईल.
- आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर या औद्योगिक केंद्रांना जोडणारी रेल्वे.
- ताशी २०० किलोमीटर इतका या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा महत्तम वेग असेल तर सरासरी वेग १४० किमी प्रतितास इतका राहील.