राज्यात अतिवृष्टीचे १०४ बळी; २७५ गावांतील जनजीवन विस्कळीत, ७३ ठिकाणी निवारा केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:55 AM2022-07-18T05:55:13+5:302022-07-18T05:57:03+5:30
राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या मोसमात आतापर्यंत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १०४ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सरासरी ४९९ मिमी पावसाची नोंद झाली असून चोवीस तासांत सरासरी ८.३ मिमी पाऊस झाला.
राज्यात १ जून २०२२ पासून आतापर्यंत एकूण ४९९.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना फटका बसला. राज्यभरातील ४४ घरांचे नुकसान झाले असून १३६८ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. राज्यभरात ७३ ठिकाणी निवारा केंद्र उभारण्यात आली असून पूरपरिस्थितीतून ११ हजार ८३६ जणांना वाचविण्यात यश आले आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या चोवीस तासांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून दोन गावांना त्यांचा फटका बसला आहे. तर ३ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू झाले. यात नागपूर १५, वर्धा ४, भंडारा २, गोंदिया ६ आणि गडचिरोली येथील ५ अशा ३२ जणांचा समावेश आहे. नाशिक विभागात नाशिकमधील १३, नंदुरबार येथे ३, धुळे येथे २ जळगाव येथे ४ आणि नगर येथील ३ जणांचा मृत्यू झाला.
धोक्याची पातळी ओलांडली
- गडचिरोली येथे २४ तासांत २०.०० मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत.
- गोदावरी आणि इंद्रावती या नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.
- त्यामुळे येथील १० हजार ६०६ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्र उघडण्यात आले आहेत.