चार वर्षांत १०५ खंडणीखोर जेरबंद

By Admin | Published: January 18, 2017 04:07 AM2017-01-18T04:07:34+5:302017-01-18T04:07:34+5:30

चार वर्षांत खंडणीचे तब्बल तीन डझन (३६) गुन्ह्यांसह खंडणीसाठी अपहरणाचे ४ तसेच खंडणीसाठी अपहरण करून हत्येचा १ गुन्हा असे एकूण ४१ गुन्हे उघडकीस आणले

105 ransom prisoners in four years | चार वर्षांत १०५ खंडणीखोर जेरबंद

चार वर्षांत १०५ खंडणीखोर जेरबंद

googlenewsNext

पंकज रोडेकर,

ठाणे- शहर पोलिसांनी मागील चार वर्षांत खंडणीचे तब्बल तीन डझन (३६) गुन्ह्यांसह खंडणीसाठी अपहरणाचे ४ तसेच खंडणीसाठी अपहरण करून हत्येचा १ गुन्हा असे एकूण ४१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर, १०५ खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच दरम्यान, शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुख्यात गुरू साटम, अनू आंग्रे, सुजित ऊर्फ तात्या पाटील, सिंधू अभंगे या चार टोळ्यांच्या हालचालींना कायमस्वरूपी ब्रेक लावला आहे. तर, रवी पुजारी तसेच उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये खंडणीसाठी धुडगूस घालणाऱ्या सुरेश पुजारी यासारख्या दोन टोळ्यांच्या हालचाली जवळपास ९० ते ९५ टक्के शांत करण्यात यश मिळाल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.
शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे परमबीर सिंह यांनी हाती घेतल्यानंतर आयुक्तालय कार्यक्षेत्रात खंडणीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने आयुक्तालय परिसरात खंडणीसाठी धमकावणाऱ्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. खंडणीसाठी धमकावणाऱ्या गुरू साटम टोळीला शांत करण्यासाठी त्या टोळीच्या मार्गदर्शकांवर झडप घातली. त्याचपाठोपाठ अनू आंग्रे (छोटा राजन टोळीचा), तर काल्हेर येथील पाटील आणि अभंगे या चार टोळ्या जवळपास पूर्णपणे शांत झाल्या असताना, मध्यंतरी खंडणीसाठी रवी पुजारी टोळीचा जोर अचानक वाढू लागला होता. ही टोळी शांत करण्यासाठी टोळीतील पोलिसांनी रेकॉर्डवरील हस्तकांची धरपकड सुरू केल्यावर जवळपास २५ हस्तक पकडण्यात यश आले. सध्या ते जेलमध्ये आहेत. तसेच रवी पुजारीच्या बहिणींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने ही टोळी ९० ते ९५ टक्के शांत झाली. ही टोळी शांत होत नाही, तोच सुरेश पुजारी याने उल्हासनगर परिमंडळात व्यावसायिकांना धमकावण्यास सुरुवात झाली तसेच फायरिंगचेही काही प्रकार घडले. याचा अभ्यास करताना ठाणे पोलिसांनी व्यावसायिकांची माहिती पुरवणाऱ्यांसह टोळीच्या हस्तकांना अटक करण्यात यश आले. अशा प्रकारे या टोळीच्या ९५ टक्के हालचाली कमी झाल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांनी दिली.
पाच कोटी मागणाऱ्यास अटक
कुख्यात टोळ्यांच्या पुढे जाऊन सर्वाधिक पाच कोटींची खंडणी मागणाऱ्यास ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले आहे.
>खंडणी पथकाची कारवाई
तक्ता
हॅकर्सला पकडले
इंटरनेट माध्यमानुसार मुलीचे फेसबुक, इन्स्ट्राग्राम, अकाउंट हॅक करून खंडणी मागणाऱ्यास अटक केली आहे. या हॅकर्सला छत्तीसगढमध्ये जाऊन पकडले. त्याचबरोबर आणखी एका गुन्ह्यात एका अल्पवयीन हॅकर्सला पकडले असून तो हजार-पाचशे रुपयांसाठी खंडणी मागत होता. खंडणी, दरोडे किंवा हत्या या गुन्हे उघडकीस आणताना एकाच वेळी सोनसाखळीचे ४५ गुन्हे उघडकीस आणून दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.चेकमेटमध्ये तीन कोटी जप्त केले
वागळे इस्टेट येथील चेकमेट या दरोड्यात खंडणी पथकाने सहा जणांना पकडून त्यांच्याकडून तीन कोटींची रोकड जप्त केली आहे.

Web Title: 105 ransom prisoners in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.