10,500 निलंबित कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद; एसटी आगार प्रमुखांकडून रुजू करून घेण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:24 AM2022-01-01T09:24:56+5:302022-01-01T09:25:12+5:30
ST bus employees : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत.
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून संपावर गेलेल्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी साडेदहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर न राहिल्याने सातशे कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतची सूचना दिली नसल्याने आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद झाली आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पतीची नोकरी गेली आहे. घरभाडे थकले आहे, त्यामुळे मी स्वखुशीने कामावर रुजू होण्यास गेले होते. मात्र सोशल माध्यमांवर गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली. त्यामुळे कामावर रुजू झाले नसल्याचे मुंबई विभागातील महिला कर्मचाऱ्यानी सांगितले.
२०४७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
वारंवार आवाहन करूनही कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत ११००८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे, तर २०४७ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आर्थिक अडचणी वाढल्या
गेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आम्ही वारंवार आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी रुजू करून घेण्यास नकार दिला आहे.
- निलंबित एसटी कर्मचारी,
औरंगाबाद विभाग
संपातील निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना तीन वेळा रुजू होण्याची संधी देण्यात आली होती. मात्र कर्मचारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. आता या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू होता येणार नाही.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ