निवडणुकीसाठी १०६ अधिकाऱ्यांचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 04:01 AM2017-01-19T04:01:17+5:302017-01-19T04:01:17+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे.
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ठामपाने कंबर कसली आहे. त्यानुसार, याकामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, आचारसंहिता पथकप्रमुख, उमेदवार हिशेब तपासणीस आणि कर्मचारी अशा एकूण १०६ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी पालिकेने एका विशेष पथकाची नेमणूक केली आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार आता प्रभागांमध्ये फेऱ्या मारून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न झाले आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार, ठामपाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसह सहा. आयुक्तांनाही या कामकाजासाठी जुंपण्यात आले आहे. तसेच नियुक्त अधिकाऱ्यांकडून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी युद्धपातळीवर नियोजन होत असून त्याबाबतच्या बैठकाही सुरू आहेत. निवडणूक कामकाजासाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी, एक आचारसंहिता पथकप्रमुख, शासनाने नियुक्त केलेले १२ अधिकारी, १२ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालिका अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७८ जणांची टीम तैनात केली आहे. (प्रतिनिधी)