राज्यातील १०६ शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव; भाषणबाजीशिवाय साताऱ्यात थाटात पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:30 AM2018-09-06T00:30:04+5:302018-09-06T00:30:22+5:30
भाषणबाजी, घोषणा यांना फाटा देत बुधवारी राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातील १०६ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
सातारा : भाषणबाजी, घोषणा यांना फाटा देत बुधवारी राज्य सरकारच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यभरातील १०६ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम पार
पडला. मंत्री तावडे यांच्यासह कोणाचीच भाषणे झाली नाहीत. तरीही एकूणच कार्यक्रम थाटात पार पडला. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना फेटे बांधलेले होते. कार्यक्रमाच्या नेटक्या आयोजनाबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. शासनाने आॅनलाईन पद्धतीने या पुरस्कारांसाठी निवड केल्याने हे काम पारदर्शकरीत्या झाले आहे, अशी भावना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी व्यक्त केली. बहुतांश शिक्षक कुटुंबियांसह कार्यक्रमासाठी आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोहळ्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र त्यांचा संदेश असलेली ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही बाबी तंत्रस्नेही असतील तर चमत्कार घडू शकतात. आपले शिक्षक अत्यंत उत्तम पद्धतीने ज्ञानदानाचे काम करत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले.
खासगी शिकवण्याशिवाय आम्ही मोठे झालो
कोणत्याही मोठ्या शाळेची झूल नाही अन् खासगी शिकवणीशिवाय शाळेचं शिक्षण घेतलं. मराठी माध्यमाच्या शाळेने आम्हाला भाषेचा स्वाभिमान दिला. या शब्दात अभिनेते आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री, भरत जाधव यांच्या शालेय आयुष्याचा प्रवास उलगडला.
रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती
आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत दिली.
‘शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो’
या कार्यक्रमात अभिनेता आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री व भरत जाधव यांनी आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. या तिघांच्याही गप्पांचा कार्यक्रम यावेळी झाला. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये पहिली ते दहावी या शालेय शिक्षण काळात शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आहोत, असे या कलाकारांनी स्पष्ट केले.