अकोला जिल्ह्यासाठी १,०७० ‘ई-पॉस’ उपलब्ध
By admin | Published: April 7, 2017 12:22 AM2017-04-07T00:22:40+5:302017-04-07T00:22:40+5:30
अकोला- विभागातील पाचही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी १,०७० मशीन बुधवारी उपलब्ध झाल्या.
संतोष येलकर - अकोला
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांसाठी १ हजार ७० ‘ई-पॉस’ मशीन बुधवारी उपलब्ध झाल्या.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दरमहा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना दरमहा धान्य वितरित करण्यात येते. राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘बायोमेट्रिक’ पद्धतीने धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यासाठी गत वर्षभरात शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरित करण्यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागातील अमरावती व वाशिम जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यात आल्या आहेत, तर अकोला जिल्ह्यातील १ हजार ५० रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन लावण्यासाठी १ हजार ७० ई-पॉस मशीन संबंधित कंपनीकडून प्राप्त झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या ई-पॉस मशीन पुढील आठवड्यात अकोला जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये लावण्यात येणार असून, या मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
बायोमेट्रिक पद्धतीने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील १ हजार ५० रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता १ हजार ७० ई-पॉस मशीन उपलब्ध झाल्या आहेत. उपलब्ध झालेल्या मशीन रास्त भाव दुकानांमध्ये लावण्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.
-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी