‘१०८’ची सेवा ठरतेय ‘संजीवनी’
By Admin | Published: January 16, 2017 06:25 AM2017-01-16T06:25:53+5:302017-01-16T06:25:53+5:30
‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी गेल्या तीन वर्षांत राज्यभरात १२ लाख जणांना ‘संजीवनी’ दिली आहे.
स्नेहा मोरे,
मुंबई- महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या (एमईएमएस) ‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी गेल्या तीन वर्षांत राज्यभरात १२ लाख जणांना ‘संजीवनी’ दिली आहे. राज्यात पुणेखालोखाल सोलापूरकरांनी या सेवेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यात तब्बल १२ लाख ७७ हजार ९१६ नागरिकांना या सेवेचा फायदा झाला आहे. यातील २०१६ या वर्षांत सर्वाधिक म्हणजे, ७७ हजार २१४ नागरिक पुण्याचे तर त्या खालोखाल ६२ हजार ३४ नागरिक सोलापूरचे आहेत.
अपघात झाल्यानंतर सुरुवातीची २० मिनिटे महत्त्वाची ठरतात, हे लक्षात घेऊन व्हेंटिलेटर, डी-फेब्रिलेटर कम मॉनिटर, इलेक्ट्रिक सक्शन, सीरिंज पंप, स्ट्रेचर, महत्त्वाची औषधे, डिलिव्हरी किट, ग्लुकोमीटर, व्हिलचेअर आदी ४२ अद्ययावत उपकरणे असलेल्या ९३७ रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकेत तीन डॉक्टर व दोन चालक असे पाच जणांचे
पथक असते.
>डायल करा ‘१०८’
रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने टोल फ्री १०८ हा नंबर डायल केल्यास तो कॉल सेंटरला जाऊन तेथून रुग्णाचे नाव, घटनास्थळ आदींची माहिती घेतली जाते. तेथून संबंधित ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकाला घटनेची माहिती दिली जाते. त्यानंतर, अवघ्या २० ते ३० मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णाला जवळच्या रुग्णालयात आणते.
रुग्णवाहिकेद्वारे या सेवा मिळतात
रस्ता अपघात, आपत्कालीन प्रसूती, नवजात बालकांसंदर्भात आजार, साथींचे आजार, नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप), मानवनिर्मित आपत्ती (दंगल, गॅसगळती, आग), अत्यवस्थ हृदयविकार, सर्पदंश, अन्न विषबाधा, भाजलेले रुग्ण, श्वसन संस्थेचे आजार, मेंदूचे आजार.
‘अँड्रॉइड अॅपची सोय’ : १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर केला जातो, आता या सेवेचा लाभ अँड्रॉइड अॅपद्वारेही नागरिकांना घेता येतो. त्यामुळे आता नव्या वर्षात अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, असे ‘एमईएमएस’चे प्रमुख संचलन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले.