दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

By अविनाश साबापुरे | Published: June 1, 2024 11:59 AM2024-06-01T11:59:21+5:302024-06-01T12:00:30+5:30

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने उचलले उल्लेखनीय पाऊल

10th, 12th Result easy syllabus for fail students relief for two lakh students | दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

दहावी-बारावी निकाल: नापास तर नापास! तुमच्यासाठी अभ्यास सोपा, दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: दहावी-बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. त्यात तब्बल दोन लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मात्र, आता या मुलांसाठी अतिशय सोप्या भाषेत अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या सोप्या अभ्यासक्रमाची त्यांच्याकडून दोन महिने तयारी करवून घेतली जाणार असून, त्यानंतर त्यांची पुनर्परीक्षा होणार आहे.

स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेला जीवन-मरणाचा प्रश्न बनवून टाकले आहे, तर पालकांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. त्यामुळे नापास विद्यार्थी नाराज होऊन शाळाबाह्य होण्याचीही भीती आहे. अनेकांकडून आत्मघाताचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यावर सोप्या अभ्यासक्रमाचा उपाय शोधण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नापासांकरिता हा सोपा अभ्यासक्रम तयार केला आहे. यात दहावी आणि बारावीच्या प्रत्येक विषयातील प्रत्येक घटक-उपघटक सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेला बसणाऱ्या दोन लाख अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी - एकूण : ८२,२१९ - नियमित : ६४,८८५ - खासगी : ४,९६५, रिपिटर : १२,३६९
  • बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी - एकूण : १,२२,७१३ - नियमित : ९४,२८६ - खासगी : ५,८०७, रिपिटर : २२,६२०


शाळानिहाय यादी करा

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी तयार करण्याचे निर्देश परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सर्व शिक्षणाधिकारी आणि डायट प्राचार्यांना दिले आहेत. जून आणि जुलै असे दोन महिने या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग घेतला जाणार आहे.

पुनर्परीक्षेसाठी सोप्या भाषेतील अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल. मात्र, यंदा शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतलेली नाही. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचेही अनेक फोन येऊ लागलेले आहेत. शासनाने कलचाचणीचा विचार करावा.
-किशोर बनारसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक-समुपदेशक संघ, पुणे

Web Title: 10th, 12th Result easy syllabus for fail students relief for two lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.