दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच!, उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:54 AM2023-03-22T05:54:38+5:302023-03-22T06:33:00+5:30
दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे.
मुंबई : दहावी, बारावीच्या निकालावर संपामुळे असलेली टांगती तलवार दूर झाली असून मंगळवारपासून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली आहे. यामुळे बारावीसह दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनी निकाल वेळेत लागणार असल्याचा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. वार्षिक नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वार्षिक परीक्षांची तयारी, मूल्यमापन, निकाल या सगळ्या गोष्टी वेळेत होतील, असेही त्यांनी सांगितले.
सोमवारी दुपारनंतर बेमुदत संप मागे घेतल्याचे जाहीर होताच मंगळवारपासून शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक कार्यालयेही नियमित सुरू झाली आहेत. मुंबईत शालेय शिक्षण विभागाचे सर्वात महत्त्वाचे असलेले शिक्षण उपसंचालक कार्यालय मागील सात दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. त्यामुळे तेथेही अनेक प्रशासकीय कामकाज ठप्प होऊन अनेक प्रस्ताव, धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी रखडली होती. मात्र मंगळवारपासून तेथील नियमित कामकाजाला सुरुवात झाली आहे.
उत्तरपत्रिका तपासणी जलद गतीने
शिक्षक संघटनांनी मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने दहावीच्या विविध पेपरच्या ७० लाखांहून अधिक तर बारावीच्या २० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्या तातडीने तपासण्यासाठी शिक्षक कामाला लागणार आहेत, त्यासाठी सर्व काम वेळेत केले जाणार असल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली. दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सर्व शिक्षक प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिक वेळ देऊन त्या तपासण्याची तयारी शिक्षकांनी ठेवली असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.