१०वी, १२वी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:02 AM2023-08-28T11:02:56+5:302023-08-28T11:15:47+5:30
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जातील.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करून दिले जातील.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली होती. विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी १ वाजल्यापासून संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणी , उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत व पुनर्मूल्यांकन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी
जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथमतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून, विहित नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.