दहावीची २९ तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:07 AM2021-01-22T01:07:22+5:302021-01-22T06:53:46+5:30
दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
मुंबई : इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत जाहीर केले.
दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
कोरोनाबाबत राज्य तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आधीच घेतला आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के उपस्थितीत सुरू आहेत आणि त्या ५० टक्के संख्येच्या ७६ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
कोरोना काळात शाळांनी शुल्क आकारण्याच्या मुद्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतले आहेत. राज्य शासन पालकांसोबतच आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाउन काळात नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले, याची पूर्ण जाणीव शासनाला आहे. शासन आपली बाजू न्यायालयात मांडेल. दरम्यानच्या काळात शाळा अन्यायकारक वागत असतील, असा पालकांचा आक्षेप असेल तर त्यांनी शिक्षण विभागाशी, उपसंचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
इयत्ता बारावीची सराव परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान तर इयत्ता दहावीची सराव परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान होईल.
काेराेना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा -
दहावी-बाराीच्या परीक्षांच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्याचे सत्र वाया जाणार नाही. त्याची फेरपरीक्षा घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.