जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र

By Admin | Published: August 31, 2016 07:22 AM2016-08-31T07:22:26+5:302016-08-31T07:22:26+5:30

विद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे.

10th certificate with birth certificate | जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र

जन्माच्या दाखल्यासोबत मिळणार दहावीचं प्रमाणपत्र

googlenewsNext
style="text-align: justify;">योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
 
विद्यार्थ्यांच्या कोवळ्या हळूवार मनाची तितक्याच कोमलपणे दखल घेणाऱ्या माननीय शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक स्तुत्य उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. मूल जन्माला आलं की महापालिकेच्या जन्मदाखल्यासोबतच, मुलाच्या 16व्या वाढदिवसाच्या तारखेचं दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.
 
जुलै-ऑगस्ट, २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनूत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी मंगळवारी घोषित केले.
 
त्यानंतर अनौपचारीक वार्तालाप करताना शिक्षणमंत्र्यांनी यापुढचं पाऊल आणखी दमदार असल्याचे सूचित केले. दहावीला नापास होणार नाही याची तर हमी मिळाली, परंतु दहावीपर्यंत पोहोचू का? शाळेत जायला जमेल का? गेलोच आणि सैराट होत आर्ची-परश्या झालो तर शैक्षणिक नुकसान होईल का? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर, पुढील काळात येण्याची शक्यता आहे. या अडचणींचा विचार करून जन्मदाखल्यासोबतच दहावीचं प्रमाणपत्र दिलं, तर विद्यार्थी अत्यंत निर्धोकपणे त्यांचं बालजीवन कृष्णलीला करत रमतगमत घालवू शकतील असा यामागचा विचार आहे.
 
यावरच न थांबता, शिक्षणमंत्री देशभरातल्या विविध विद्यापीठांशी आणि कंपन्यांशी टाय अप करण्याचा प्रयत्न करत असून पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण व कँपस इंटरव्यूची सोय मुलाच्या जन्माच्यावेळीच करता येईल का याची चाचपणी करत आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मंत्र त्यासाठी उपयोगाला येईल असा शिक्षणमंत्र्यांना विश्वास आहे. उगाच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उंबरठे झिजवण्यापेक्षा मुलाची डीएनए टेस्ट करून तो मोठेपणी कोण होईल हे ठरवता येणं आणि त्या अनुषंगानं पदव्या व नोकरीचं वाटपही जन्मदाखल्यासोबतच करता येईल अशी त्यांची अटकळ आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला शहाणं करून सोडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा आदर्श शिक्षणमंत्र्यांच्या डोळ्यासमोर आहेच. विश्वाचं सार सांगणारी ज्ञानेश्वरी लिहून अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांना डिग्रीची अडचण भासली नाही, तर आपल्याला का भासावी असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला असून, हा विषय याच टर्ममध्ये मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे.
 
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)

Web Title: 10th certificate with birth certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.