सिंचन घोटाळ्यात ११ जणांवर गुन्हा !
By admin | Published: August 26, 2015 05:26 AM2015-08-26T05:26:58+5:302015-08-26T05:33:28+5:30
रायगड जिल्ह्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सहा शासकीय अधिकाऱ्यांसह पाच कंत्राटदारांवर ठाण्यातील कोपरी पोलीस
ठाणे : रायगड जिल्ह्यातील सिंचन घोटाळ््याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सहा शासकीय अधिकाऱ्यांसह पाच कंत्राटदारांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबी पथकाने पुणे, सोलापूरमध्ये अधिकाऱ्यांच्या घरांवर छापेही टाकले.
कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि शाखा अभियंत्यासह कंत्राटदारांचा त्यात समावेश आहे. कंत्राटदारांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण आहेत. याप्रकरणी पोलिसांनी राजेश रिठे, निसार खत्री यांना अटक केली आहे.
पेण येथील बाळगंगा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याबाबत ठाणे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळांनी २००९ मध्ये निविदा मागविल्या होत्या. पाटबंधारे विभागातील तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळ तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग-१चे (कोलाड) तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, तत्कालीन उप अभियंता राजेश रिठे आणि तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट यांनी एफ. ए. एन्टरप्रायजेस या कंत्राटदारास फायदा होण्यासाठी ‘शाई’ या दुसऱ्या धरणाचे संकल्पचित्र वापरून बाळगंगाचा घाईगर्दीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची प्रशासकीय मान्यता नसतानाही हे काम करण्यात आले. खोट्या नोंदी करून निविदेसाठी परवानग्या घेतल्या. नाशिकच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेने बाळगंगा धरणासाठी बनविलेले संकल्पचित्र न वापरता शाई धरणाचे संकल्पचित्र वापरून काम चालू केले. त्यामुळे कामाची व्याप्ती व खर्चही वाढला. आर्थिक तरतूद होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया सुरु केली. एफ .ए. कंस्ट्रक्शनकडे त्याच कालावधीत सहा कामे असल्यामुळे ती फर्म अपात्र ठरत असतानाही त्यांना पात्र ठरवले. वनजमिनीची अट त्यांनी अधिकारात रद्द करून खुली स्पर्धा टाळून एफ. ए. एन्टरप्रायजेस ठेकेदाराचा फायदा करून दिल्याचा अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय विभिन्न ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदांचे मुल्यांकन करताना एफ. ए. एन्टरप्रायजेसला मशिनरीचे गुण देऊन अपात्र असतानाही पात्र ठरविले.
एसीबीने पुणे, ठाणे,सोलापूर व कोल्हापूरमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे घातले. त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी पथकातील अधिकारी करीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यात रामचंद्र शिंदे तर सांगोल्यातील बाळासाहेब पाटील यांच्या घरी झाडाझडती घेण्यात आली.
पुण्यात गिरीष बाबर यांच्या एरंडवणे येथील फ्लॅटवर पथकाने छापा टाकला. त्यावेळी बाबर व त्यांच्या पत्नी घरीच होते. रामचंद्र शिंदे यांच्या प्रभात रस्त्यावरील फ्लॅटवरही छापा घालण्यात आला.
कोल्हापूरमध्ये कोकण पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्या महाडिक कॉलनीतील बंगल्याची पथकाने झडती घेतली.
यांच्यावर गुन्हा दाखल...
शासकीय अधिकारी -
१) गिरीश बाबर (तत्कालीन कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विभाग), २) बाळासाहेब पाटील (तत्कालीन मुख्य अभियंता, कोकण प्रदेश, मुंबई), ३) रामचंद्र शिंदे (तत्कालीन अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ), ४) आनंदा काळुके (तत्कालीन कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग -१ कोलाड), ५) राजेश रिठे (तत्कालीन उप अभियंता, कोलाड), ६) विजय कासट (तत्कालीन शाखा अभियंता, कोलाड).
कंत्राटदार व त्याचे कु टुंबीय ७) निसार खत्री,
८) फतेह खत्री, ९) जैतून खत्री, १०) अबीद खत्री, ११) जाहीद खत्री.