११ बड्या प्रकल्पांची औरंगाबादला हुलकावणी
By Admin | Published: July 10, 2017 05:21 AM2017-07-10T05:21:08+5:302017-07-10T05:21:08+5:30
दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ११ बड्या प्रकल्पांच्या गुंतवणुकीची फक्त चर्चाच आजवर झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आॅरिकमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) ११ बड्या प्रकल्पांच्या गुंतवणुकीची फक्त चर्चाच आजवर झाली. हे सर्व प्रकल्प डीएमआयसीऐवजी इतरत्र पळवून नेले गेले. गेल्या सहा महिन्यांत तीन मोठ्या कंपन्या महाराष्ट्राच्या हातून निसटल्या. परिणामी, सुमारे २० ते २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि लाखाहून अधिक रोजगाराला मराठवाडा
मुकला आहे.
महिंद्रा, फोक्सवॅगन, नेस्ले, हीरो, होंडा, फोर्ड, मारुती सुझुकीनंतर किया मोटार्स, एलजी, एसएआयसी या प्रकल्पांची गुंतवणूक डीएमआयसीमध्ये होणार अशी फक्त चर्चाच झाली. पण हे उद्योग दुसरीकडेच गुंतवणुकीसाठी सरसावले.
शासनाने डीएमआयसीच्या दोन नोडमध्ये भूसंपादनासाठी ३ हजार कोटी रुपये गुंतविले. शिवाय, आॅरिक सिटीच्या प्रशासकीय हॉल व इतर सुविधांच्या विकासाची कामे गतिमान केली आहेत. बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील १,३९० कोटींचे टेंडर अंतिम झाले आहे. शेंद्रा डीएमआयसीतील प्रशासकीय इमारत डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. पहिला टप्पा २०२० पर्यंत, दुसरा टप्पा २०२१ पर्यंत, तर तिसरा टप्पा २०२२ पर्यंत होईल. ४५ मीटर रोड याअंतर्गत विकसित होईल, त्यात ड्रेनेज, विद्युत, साइड ड्रेन, भारतात प्रथमच रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिकल स्ट्रेंच वापरण्यात येणार आहे. शेंद्रा ते बिडकीन असा एनएचएआय रोड विकसित केला जाणार आहे. जालन्यातील ड्रायपोर्ट ते शेंद्रा हे अंतर ४० कि.मी. आहे. ४५ कि़मी.वर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शेंद्रा-बिडकीन इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी ७ हजार ९४७ कोटींची तरतूद बजेटमध्ये झालेली आहे.
असे असतानाही मोठे प्रकल्प
विदर्भात आणि राज्याबाहेर का
जात आहेत. याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
एसएआयसी गुजरातला जाणार
एलजी, किया मोटार्स पाठोपाठ आता एसएआयसी (शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन) या चीनच्या बड्या कंपनीने औरंगाबादच्या डीएमआयसीला हुलकावणी दिली आहे. एसएआयसीने पुणे आणि औरंगाबादमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी केली. मात्र, गुजरातमधील हल्लोळ येथे या कंपनीने टप्प्याटप्प्याने २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. एमजी ब्रँड कारचे उत्पादन या प्रकल्पातून केले
जाणार आहे.
>प्रतीक्षेपलीकडे काहीही नाही
किया मोटार्स, एलजी, एसएआयसीने हुलकावणी दिल्यानंतर आॅरिकमध्ये मोठ्या उद्योगाची प्रतीक्षा लागलेली आहे. शेंद्रा आणि बिडकीनमध्ये सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. आॅरिकमध्ये उद्योग भेटी देत असल्याचे फक्त दावे होत आहेत. सध्या तरी कुठलाही मोठा उद्योग डीएमआयसीच्या संपर्कात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.