एसटीच्या चार विभागांचा ११ कोटींचा महसुल पाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:49 PM2019-08-12T12:49:37+5:302019-08-12T12:55:37+5:30
महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे.
पुणे : अतिवृष्टी व महापुरामुळे एसटी महामंडळाचे अनेक फेऱ्या रद्द केल्याने दहा दिवसांत सुमारे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामध्ये पुण्यासह कोल्हापुर, सांगली व सातारा विभागातील तब्बल ५० हजार फेºया झाल्याने ११ कोटींहून अधिक उत्पनावर पाणी सोडावे लागले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापुर विभागाला बसला असून ३० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज एसटी महामंडळाने वर्तविला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
पाऊस व महापुराचा सर्वाधिक फटका एसटीच्या कोल्हापुर विभागाला बसला आहे. कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. या विभागातील दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यान सुमारे २९ हजार ५१७ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा महसुल बुडाला आहे. त्याखालोखाल सांगली विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या विभागातील सुमारे ८ हजार फेऱ्या रद्द केल्याने सव्वा चार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यानंतर सातारा विभागातील सुमारे ६ हजार तर पुणे विभागातील सुमारे ४ हजार फेºया रद्द केल्या आहेत. या आगारांतून सांगली व कोल्हापुरसह कर्नाटकडे जाणारी सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ५ आॅगस्टपासून एकही बस या दिशेने रवाना झालेली नाही. सोलापुर विभागातूनही सुमारे दीड हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एकुण ११ कोटी १३ लाख रुपयांचा महसुल बुडाला असून बसस्थानकांचेही नुकसान झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
...........
पाच विभागांची दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यानची स्थिती
विभाग रद्द फेऱ्या बुडालेला महसुल
पुणे ३९६५ १,११,३६,९७६
सांगली ८०६० ४,२५,९१,५५५
कोल्हापुर २९५१७ ३,३०,११,२६८
सातारा ६१८० २,१५,१७,६४६
सोलापूर १४७४ ३०,५६,६९३