शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीचे मिळणार ११ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:44 AM2018-12-19T11:44:40+5:302018-12-19T12:02:50+5:30
राज्यातील १७ हजार १७१ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
पुणे : राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील १७ हजार १७१ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
राज्यात एप्रिल आणि मे २०१८मध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फळभाज्या आणि फळ पिकांचे नुकसान झाले होते. एप्रिल महिन्यात राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. या महिन्यात राज्यातील ५ हजार ९३ हेक्टर ६५ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा १२ हजार ७२६ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातही मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात सर्वाधिक हानी झाली. औरंगाबाद विभागातील २ हजार १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्या खालोखाल पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पुणे विभागातील ८५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.
मे महिन्यात राज्यातील १३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला होता. पुणे, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद विभागात अवकाळीने नुकासन झाले होते. राज्यातील १ हजार ७४० हेक्टर ७४ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्यात पुणे विभागाला सर्वाधिक १ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली होते. अवकाळीच्या या फेऱ्यामुळे ४ हजार ४०९ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. या महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना २ कोटी ९३ लाख ६५५ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एप्रिल आणि मे या महिन्यात मिळून राज्यातील ६ हजार ८३८ हेक्टर आणि ३९ एकर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा फटका १७ हजार १७८ शेतकऱ्यांना बसला होता. त्या पोटी ११ कोटी ७ लाख ९९ हजार १९५ रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
महसूल आणि कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. मदत निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
------------
एप्रिल मधे अवकाळीमुळे झालेले नुकसान
जिल्हा बाधित शेतकरी बाधित क्षेत्र मदत निधी लाखात
रायगड २००५ ४१५.८४ १०४.०४
पुणे ३६८ ७९.६९ १२.५२
सांगली २९१ १३४.८० २२.९८
सोलापूर ६८८ ५५७.८२ ९०.१६
कोल्हापूर ५५८ ८७.२९ १५.५७
अहमदनगर ८२१ ३२९.१२ ४७.९०
बीड ९७२ ४६९.७६ ७८.३६
उस्मानाबाद १२८८ ५६३.०५ ८४.८८
लातूर ८२४ ४४५.२८ ७०.८१
नांदेड २०८४ ६२५.९१ ८९.३६
अमरावती २७१ २३७.७० ३४.१३
यवतमाळ २१४ १५० १८.९५
वाशिम २६७ १४३.३५ २१.३९
गडचिरोली २०९ ७८.७९ १०.४८
-------------------------