पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी
By admin | Published: July 2, 2016 02:05 AM2016-07-02T02:05:01+5:302016-07-02T02:05:01+5:30
मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती
पिंपरी : मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती. त्यामुळे एकाच दिवसात सुमारे ११ कोटी रुपये कर जमा झाला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत १६६ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकर भरण्यासाठी ३० जून ही मुदत देण्यात आली होती. शास्तीकर लावून मिळकतकराची वाढीव बिले आल्याने कर भरण्याविषयी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, शास्तीकर वगळून बिले भरण्याची
सुविधा महापालिकेने दिल्याने शास्ती वगळून कर भरण्यास नागरिक प्राधान्य देत होते.
करसंकलनासाठी महापालिकेने जनजागृती अभियानही राबविले होते. शहरातील प्रमुख चौकात फ्लेक्सही उभारले होते. ‘मिळकतकराची रक्कम भरावी, यासाठी करसंकलन विभागाने सामान्य करात ५० टक्क्यांपर्यत सवलतीची योजना राबविली होती. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रविवार सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय केली होती. त्याचबरोबर आॅनलाइन भरण्याची सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. आॅनलाइन भरण्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडली.(प्रतिनिधी)
>दहा हजार मिळकत धारकांनी भरला कर
गुरुवारी एकाच दिवशी एकूण १० हजार ५५२ जणांनी मिळकतींचा सुमारे दहा कोटी ९५ लाखांचा कर नागरिकांनी भरला आहे. सर्वाधिक भरणा थेरगाव विभागातून झाला आहे. ५७१ मिळकतधारकांनी सुमारे दोन कोटींचा कर भरला आहे. त्या पाठोपाठ भोसरीतील केंद्रावर ५८२ जणांनी सुमारे १ कोटी ९ लाख रुपये कर भरला, तसेच पिंपरी वाघेरेतील केंद्रावर ३०५ जणांनी १ कोटी ६ लाख ९६ हजारांचा कर भरला आहे. गेल्या तीन महिन्यांत १ लाख ८३ हजार ५५२ जणांनी १६६ कोटी कराचा भरणा झाला आहे.