महापालिका नेमणार ११ निवडणूक अधिकारी
By admin | Published: January 1, 2017 10:08 PM2017-01-01T22:08:22+5:302017-01-01T22:08:22+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 1 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार, पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी एकुण ११ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. १० निवडणूक निर्णय अधिकाठयांकडे तीन प्रभाग तर एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील १० महापालिका, २६ जिल्हापरिषदा आणि २९६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेची काम पूर्ण झाले आहे. विधानसभा मतदार यादीचे महापालिका प्रभागनिहाय विभाजन करण्याची काम सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे आवश्यक आहे. त्याबाबतचे सूत्र, धोरण निश्चित करण्यात आले आहे.
एखाद्या जिल्ह्यात जर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार संवर्गातील अधिकारी उपलब्ध नसतील तेव्हा महसुल विभागातील इतर जिल्ह्यांमधून आवश्यक अधिकारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विभागिय आयुक्तांवर असेल. तथापि, अधिकारी उपलब्ध न झाल्यास इतर महापालिकांमधील उपायुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमता येणार आहे.
राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्ररभाग पद्धत रद्द करून चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली आहे. त्यानुसार, बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीस अनुसरून तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याबाबत सुधारीत आदेश जारी केला आहे.
महापालिकेतील निवडणुकीसाठी ३२ प्रभागांनुसार, प्रत्येकी तीन प्रभागांकरिता एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी एकुण ११ निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत. १० निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तीन प्रभाग तर एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दोन प्रभागांची जबाबदारी असेल.