११ ‘खुनी’ पोलिसांची पुन्हा तुरुंगात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2015 01:55 AM2015-12-22T01:55:11+5:302015-12-22T01:55:11+5:30
छोटा राजन टोळीचा हस्तक मानला गेलेल्या रामप्रसाद विश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट चकमकीत खून केल्याबद्दल जन्मठेप झालेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
मुंबई : छोटा राजन टोळीचा हस्तक मानला गेलेल्या रामप्रसाद विश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट चकमकीत खून केल्याबद्दल जन्मठेप झालेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
सत्र न्यायालयाने जुलै २०१३मध्ये जन्मठेप ठोठावल्यापासून हे सर्व पोलीस ठाणे मध्यवर्ती कारागृहात होते. परंतु ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारने, कथित विशेष अधिकाराचा वापर करून, त्यांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती दिल्याने ते तुरुंगातून बाहेर आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारच्या या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिल्याने या पोलिसांना शरण येऊन पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
लखनभय्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात याचिका केली आहे. न्या. रणजीत मोरे आणि न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. युग चौधरी, दोषी पोलिसांसाठी ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले आणि सरकारतर्फे अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर उषा केजरीवाल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने याचिका दाखल करून घेत सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. प्रतिवादी पोलिसांनी येत्या ४ जानेवारीपर्यंत पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी स्वत:हून शरण यावे, असा आदेश देत याचिकेरील पुढील सुनावणी ७ मार्च रोजी ठेवली.
हे आहेत ते ११ पोलीस
दिलीप पालांडे, नितीन सरतापे, गणेश हरपुडे, आनंद पडते, प्रकाश कदम, देवीदास सकपाळ, पांडुरंग कोकम, रत्नाकर कांबळे, संदीप
सरदार, तानाजी देसाई आणि विनायक शिंदे. (प्रतिनिधी)