वाल्मीकी मेहतर मेळाव्यात ११ जोडपी विवाहबद्ध
By admin | Published: May 11, 2014 11:53 PM2014-05-11T23:53:43+5:302014-05-12T00:05:21+5:30
मेहतर समाजाचा ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा थाटात
खामगाव: महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायत बहुउद्देशिय संस्थेअंतर्गत बुलडाणा जिल्हा वाल्मिक मेहतर सुदर्शन समाजाच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील पहिला ऐतिहासिक सामुहिक विवाह सोहळा आज रविवारी थाटात पार पडला. स्थानिक जे.व्ही.मेहता विद्यालयाच्या प्रांगणात राज्यातील ११ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्यात मेहतर समाजासोबतच आंतरशाखीय आणि आंतरजातीय विवाह वाल्मिक विवाह पद्धतीने लावण्यात आला. या सोहळ्याचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. रात्री वाल्मिक विवाह पद्धतीने काही विधी पार पडले. त्यानंतर आज रविवारी पहाटे पासूनच विविध कार्यक्रमांनी या सोहळ्यात रंगत आणली. या सोहळ्यात मेहतर समाजाच्या जोडप्यांसह आंतरशाखीय आणि आंतर जातीय विवाह लावण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रीकांत धेडूंदे-बबिता चव्हाण, सचिन धेंडूदे- मोहिनी चव्हाण, शिवा निंदाने-डिंपल कंडारे, रवी चंडालिया- ममता कोहली, संतोष सावते- लक्ष्मी सारसर, विजय बालवे- मिनाक्षी चावरे, आनंद तंबोळे- पूजा बहुनिया, सुनील राजपूत- दिपाली पळसपगार, विवेक सावते- ममता डिंगे, कमल तंबोळे- सोनम गुंज, कैलास चावरे-सुरेखा तेजी या जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. यावेळी अकोला, अमरावती, अमळनेर, हिवरा आश्रम, हिंगोली, हैद्राबाद, यवतमाळ, कुर्हा, आर्वी, मुक्ताईनगर आदी ठिकाणचे जोडपे सहभागी झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष गणेश माने, माजी आ. नाना कोकरे भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायतीचे प्रदेश अध्यक्ष प्रतापराव निंदाने उपस्थित होते. या सोहळ्यात शनिवार १0 मे रोजी युवक युवती परिचय संमेलन तथा समाज प्रबोधन कार्यक्रम झाला. आज रविवारी सकाळी ९ वाजता टिका-मंगनी, गोरवा, तोरण आदी विधी पार पडल्या. त्यानंतर ११.३0 वाजतानंतर जोडप्यांचे फेरे पार पडले. दुपारी बिदागिरी या सोहळ्याने पहिल्या राज्यस्तरीय सामुहिक विवाह सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायत बहुउद्देशिय संस्थेअंतर्गत बुलडाणा जिल्हा वाल्मिक मेहतर सुदर्शन समाजाचे पदाधिकारी सुरेश सारवान, सुभाष चव्हाण, धेंदूडे, डॉ.बेगी, चावरे आदी पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
** फलकावरील बायोडाटावरून जुळले विवाह!
वाल्मिक मेहतर समाज बावनी पंचायतीच्यावतीने आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात शनिवारी सायंकाळीच अनेक जोडप्यांचे विवाह जुळले. एका डिजीटल बोर्डवर राज्यातील वधु-वरांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. सोहळ्यासाठी आलेल्या उपवर-वधु आणि त्यांच्या नातेवाईकांनी योग्य स्थळांशी चर्चा केली. काही तासातच विवाहाचा योग जुळून आला. यातील एक विवाह केवळ २५ मिनिटांच्या अवधीत जुळला. पंचायतीने राज्यभर फिरून संकलित केलेले उपवर-वधुंचे बायोडाटा या डिजीटल फलकावर लावण्यात आले होते.