११ पोलिसांची शिक्षा स्थगित
By admin | Published: December 4, 2015 03:09 AM2015-12-04T03:09:50+5:302015-12-04T03:09:50+5:30
बहुचर्चित लखनभय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह ११ पोलिसांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती मिळाली आहे.
मुंबई : बहुचर्चित लखनभय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसह ११ पोलिसांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती मिळाली आहे. आता पुढील सहा महिने देशात कोठेही ते मुक्तपणे संचार करु शकणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर गृह विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले.
वादग्रस्त एन्काऊटर स्पेशालिस्ट व निलंबित निरीक्षक प्रदीप शर्मा याच्या पथकांतील दोघा निरीक्षकासह एकूण १२ जणांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर शर्माला पुराव्याअभावी निर्दोष सोडले होते. प्रदीप सूर्यवंशी यांचे निधन झालेले असून निरीक्षक पालांडेसह ११ जण ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांचे अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तत्कालिन निरीक्षक पालांडे व अन्य १० पोलिसांनी शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी गृह विभागाकडे अर्ज केला होता. त्यासंदर्भात न्यायालयाचा अभिप्राय, मानवी हक्क आयोगाचा निकाल, जिल्हाधिकारी, तुरुंग महानिरीक्षक व मुंबई पोलीस आयुक्तांकडून आलेल्या अहवालाचा विचार करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर तातडीने गृह विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले. त्यांना कारागृहातून सुटका झाल्यापासून सहा महिने कुटुंबियांसमवेत राहता येणार आहे.
सहकाऱ्यांची गर्दी
आरोपी ‘पोलिसां’ची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांनी बाहेर गर्दी केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर असलेल्या आपल्या कुटुंबप्रमुखाला भेटल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. यावेळेस या सर्व दहा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे ठाणे आणि मुंबईतील सहकारीही त्यांना भेटण्यासाठी तिथे आले होते. निरीक्षक प्रदीप शर्मा यांचाही त्यामध्ये समावेश होता. भाजपाचे नेते रवींद्र आंग्रे हेही सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोहोचले होते. मात्र, तोपर्यंत सुटका झालेले ‘बंदी’ निघून गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. काही काळापुरती का होईना, या अधिकाऱ्यांच्या शिक्षेत शासनाने स्थगिती दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षा झालेले पोलीस... दिलीप पालांडे, नितीन सरतापे, गणेश हारपुडे, आनंद पालांडे, प्रकाश कदम, देवीदास सकपाळ, पांडुरंग कोकम, रत्नाकर कांबळे, संदीप सरदार, तानाजी देसाई व विनायक शिंदे.
काय होते हे प्रकरण?
छोटा राजनचा निकटचा साथीदार रामनारायण विश्वनाथ गुप्ता उर्फ लखन भैय्या याला प्रदीप शर्मा याच्या पथकाने ११ नोव्हेंबर २००६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथे साथीदार अनिल भेडासमवेत पकडले होते. त्यानंतर त्याच सायंकाळी त्याला वर्सोवातील नानानानी पार्क येथील निर्जनस्थळी नेऊन ठार केले. मात्र तो चकमकीत मारला गेल्याचे दाखविण्यात आले.
त्याबाबत त्याच्या भावाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत प्रदीप शर्मासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावयास भाग पाडले होते.
तत्कालिन पोलीस आयुक्त अनामी रॉय यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुलै २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने शर्मा वगळता अन्य १२ अधिकारी, कर्मचारी व अन्य ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.