राज्यात ११ टेक्सटाईल्स पार्क उभारणार
By admin | Published: January 12, 2016 02:07 AM2016-01-12T02:07:29+5:302016-01-12T02:07:29+5:30
जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे
जालना : जेथे शेतमाल पिकतो तेथेच प्रक्रिया उद्योग उभारला जावा. विदर्भ व मराठवाड्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. कापसापासून कापडापर्यंत उद्योग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठीे राज्यात ११ टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी विदर्भात ६ व मराठवाड्यात ५ असतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. जालनामध्ये आयोजित पीक प्रात्यक्षिक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मध्यप्रदेशातील कृषी विकास दर वाढीचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, केवळ शेततळ्यांमुळेच हे राज्य ३४ टक्के कृषी विकास दर गाठू शकले. यानंतर मागेल त्याला शेततळे देण्याची योजना राज्य सरकारची असून, आगामी पाच वर्षांत पाच लाख शेततळे उभारण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.
राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू असून, शाश्वत शेतीसाठी या क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यासाठी सरकारने वीज, पाणी, बियाणे या सुविधांसाठी गतवर्षी ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यंदा ५ हजार कोटींची करणार असल्याचे मुख्यमंत्रीे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
- पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, तसेच जलसाठांच्या विकेंद्रीकरणसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केली.
- पाच वर्षांत २० हजार गावांत ही योजना राबविली जाणार असून याचे चांगले परिणाम दिसून येत आहे.
- एकाच वर्षात २४ टीएमसी पाणी साठवले गेले असून १४०० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातील ४०० कोटी रुपये शेतकरी आणि सर्वसामान्यांनी दिले आहेत.