राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६९ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 06:05 AM2020-08-07T06:05:07+5:302020-08-07T06:44:54+5:30
मृत्युदर ३.५० टक्के; एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार
मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ५१४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३१६ मृत्यू झाले आहेत. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ झाली असून मृतांचा आकडा १६ हजार ७९२ झाला.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के असून मृत्युदर ३.५० टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ३१६ मृत्यूंमध्ये मुंबई ५७, ठाणे ११, ठाणे मनपा २७, नवी मुंबई मनपा २, कल्याण-डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी-निजामपूर मनपा ६, पालघर ४, वसई-विरार मनपा ६, रायगड ४, पनवेल मनपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत ५७ बळी
मुंबईत गुरुवारी ९१० रुग्ण व ५७ मृत्यू झाले आहेत. शहर, उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २० हजार झाली असून बळींची संख्या ६ हजार ६४८ आहे. आतापर्यंत ९२ हजार ६५९ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या २० हजार ५४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे व पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत अधिक आहे, ठाण्यात २७ हजार १२ तर पुण्यात ४१ हजार सक्रिय रुग्ण आहेत.
ठाण्याची रुग्णसंख्याही एक लाखाच्या पुढे
राज्यात गुरुवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. ठाण्यात सध्या एकूण रुग्णसंख्या १ लाख ८७५ असून बळींचा आकडा २ हजार ८७९ आहे. आतापर्यंत ७० हजार ९८३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.