मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर

By admin | Published: April 17, 2017 10:58 PM2017-04-17T22:58:55+5:302017-04-17T22:58:55+5:30

मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले

11 thousand 747 crores approved for the work of Mumbai-Goa highway | मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले असून, हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या एक टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

केंद्र शासनाच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम) मदन येरावार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) प्रवीण पोटे- पाटील, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाच्या कालावधीत 2014 पर्यंत देशभरात 5 हजार 700 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, असे सांगून गडकरी म्हणाले की, त्यानंतर आतापर्यंत 19 हजार 525 किमी लांबीचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन निर्मिती केल्या जाणाऱ्या महामार्गांचाही समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20 हजार कोटीचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केले असून, त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या बैठकीत गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा घेऊन सूचना केल्या. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 किमी लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे. जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

गडकरी पुढे म्हणाले की, महामार्गांवर नदीवरील पुलांचे बांधकाम करताना हे पूल बॅरेजेस म्हणून रुपांतरित करण्यासाठी त्याप्रमाणे आराखडे तयार करावेत. पाणीटंचाईच्या काळात हे पुलाचे बॅरेजेस उपयुक्त ठरतील. मराठवाडा, विदर्भात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीसाठी मुरुम तसेच मातीची गरज भासते. अशा वेळी स्थानिक शेतकऱ्यांना विनामूल्य शेततळे खोदून देऊन तेथील मुरुम या कामासाठी घेतल्यास शेतकऱ्यांचाही फायदा होईल.

गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू- वसई- अलिबाग- श्रीवर्धन- दाभोळ- गणपतीपुळे- रत्नागिरी- देवगड- मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱ्याशेजारून जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा डीपीआरही जवळपास पूर्ण झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया 31 मे 2017 पर्यंत पूर्ण करून कार्यादेश देण्यात यावेत, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: 11 thousand 747 crores approved for the work of Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.