राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 06:12 AM2018-12-15T06:12:21+5:302018-12-15T06:12:52+5:30
आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे.
ठाणे : राज्यात या वर्षात सुमारे ३३ हजार रस्ते अपघातांची नोंद झाली यात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे. यातील बळीची संख्या ७३० ने वाढली तरी जखमी संख्या मात्र घटली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात मुंबई शहरात झाले असले तरी कोल्हापुरात नोंदवल्या गेल्या अपघातात गतवर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६५ ने अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.
राज्यातील अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रस्ते आणि अपघातांसंदर्भात असलेल्या सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार सर्वच यंत्रणा ते रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. तसेच सूचना आणि सुधारणांसंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात राज्यातील ३४ जिल्हे आणि ९ शहरे अशी ४३ ठिकाणी एकूण ३२ हजार ८५२ अपघात झाले आहेत. यामध्ये ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला असून २९ हजार १४ जण जखमी झाले आहे. तर गतवर्षी या अकरा महिन्यात ३२ हजार ४८३ अपघातांची नोंद झाली होती. त्यावेळी ११ हजार ०६६ जणांचा मृत्यू तर २९ हजार १२६ जण जखमी झाले होते. तुलना करायची झाली तर यंदा अपघातांची संख्या १.१ टक्क्यांनी वाढली असून या अपघात दगावणाºयांची संख्या ६.६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र,जायबंदी होण्याचे प्रमाण वजा ०.४ इतक्यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात अपघात वाढले
गतवर्षी ठाणे जिल्ह्यात ७८६ अपघातांची नोंद होती. त्यामध्ये २१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५४२ जायबंदी झाले होते. यावर्षात ८२१ अपघात झाले असून त्यामध्ये २६६ जणांचा मृत्यू तर ५९४ जण जखमी झाले आहेत. शहरात गतवर्षी ८८९ अपघातात २०१ जणांना मृत्यू झाला तर ८९१ जण जखमी झाले होते. यावर्षात ८९१ अपघातांच्या नोंदीत २२९ जण दगावले असून ९१८ जण जायबंदी झाले आहेत.
कुठे गेले जास्त बळी
टक्केवारीनुसार गतवर्षाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त १४८ बळी या वर्षात कोल्हापुरात गेले आहेत. त्यापाठोपाठ सातारा ६९, सिंधूदुर्ग-४०,नंदुरबार-२९, उस्मानाबाद-२५,सोलापूर- २४,ठाणे-२३,रायगड-२२ अशाप्रकारे संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
जखमींमध्ये ठाणे ६ नंबरवर
टक्केवारीनुसार अपघातील बळींपाठोपाठ ७४ टक्क्यांनी जखमींची संख्या कोल्हापुरात अधिक असल्याचे दिसते. त्या पाठोपाठ,सोलापूर २७, बुलडाणा-२६, रायगड-२३, अहमदनगर १६ आणि ठाणे आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दहा इतक्या टक्के इतकी जखमींची संख्या आहे.