आई-मावशीनेच विकले ११ वर्षिय मुलीला

By Admin | Published: July 20, 2016 10:34 PM2016-07-20T22:34:52+5:302016-07-20T22:34:52+5:30

आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनीही वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. माय मरो नि मावशी जगो असेही काहींनी म्हटले आहे

The 11-year-old girl who was sold by her mother and mother | आई-मावशीनेच विकले ११ वर्षिय मुलीला

आई-मावशीनेच विकले ११ वर्षिय मुलीला

googlenewsNext

औरंगाबाद : आईची महती साऱ्या थोरा-मोठ्यांनीही वर्णिली आहे. मावशीच्या मायेलाही तोड नाही. माय मरो नि मावशी जगो
असेही काहींनी म्हटले आहे. पण या दोन अतिजवळच्या नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना आपल्या शहरात
घडली आहे. देहविक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वत:च्या ११ वर्षीय मुलीलाच आई आणि मावशीने दलालाच्या
माध्यमातून अडीच लाखांत विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

 राजस्थानमध्ये एका शहरात  पोलिसांनी एका कुंटणखान्यावर छापा मारला तेव्हा तेथे औरंगाबादेतील ही चिमुकली पोलिसांना आढळली. राजस्थान पोलिसांच्या कारवाईमुळे औरंगाबादेतील ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात त्या निर्दयी आई, मावशी, दलाल आणि मुंबईतील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई सुशीला (४०,नाव बदलले आहे), मावशी उषा (३२, दोन्ही रा. मुुकुंदवाडी रेल्वे रुळ परिसर), दलाल नितीन रोकडे (रा. वडीगोद्री,ता. अंबड, जि.जालना) आणि चिमुकलीला खरेदी करणारी मुंबईतील ग्राहक पूजा अशी आरोपींची नावे आहे

याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, सुशीला हिचा पती मृत झालेला आहे. सुशीला हीस स्वाती (११) आणि अर्पता (९, दोन्ही मुलींची नावे बदलली आहेत) या मुली आहेत. दलाल नितीनसह सुशीला आणि उषा या दोन्ही बहिणी मुकुंदवाडीतील रेल्वे रुळ परिसरात राहतात. या दोन्ही मुली संगोपन आणि शिक्षणासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी तिने छावणीतील विद्यादीप बालगृहात दाखल केलेल्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे १४ एप्रिल रोजी सुशीला आणि नितीन हा बालगृहातून दोन्ही मुलींना घरी घेऊन गेले. या दोन्ही मुलींना त्यांच्यासोबत पाठविण्यास बालगृहाच्या अधीक्षिका तयार नव्हत्या. त्यावेळी त्यांनी वॉर्डन यांच्याशी भांडण करून शाळेतून टी.सी. काढून घेतल्या आणि दोन्ही मुलींना आम्हीच शिक्षण करणार असल्याचे सांगितले. दोन्ही मुलींची आईच त्यांचा सांभाळ करण्यास तयार असल्याने त्यांना बालगृहातून सोडण्यात आले.

राजस्थानातील कुंटणखान्यात आढळली स्वाती
राजस्थानमधील रामनगर (जि.गुंडी) येथील रेड लाईट एरियातील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी स्वातीची सुटका केली. त्यावेळी तिचे नावही आरोपींनी बदलले होते. शिवाय स्वाती हिलाही बदललेले नाव सांगायची सक्त ताकीद आरोपींनी दिली होती. चौकशीदरम्यान स्वाती ही औरंगाबादेतील रहिवासी असल्याचे राजस्थान पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांनी विद्यादीप बालगृहाच्या अधीक्षिकांना तुमच्या बालगृहातील मुलीची आम्ही सुटका केल्याचे सांगितले. पोलिसांनी कळविलेल्या नावाची चिमुकली आमच्या बालगृहातील नाही, असे अधीक्षिकांनी सांगितले. त्यावेळी राजस्थान पोलिसांनी स्वातीचे छायाचित्र त्यांना पाठवले. त्यानंतर स्वाती आणि अर्पिता या दोन्ही बहिणींपैकी एक असल्याचे समजले.

आठ दिवसांच्या प्रयत्नानंतर मिळाले आरोपी
या घटनेची माहिती बालगृहाच्या अधीक्षिकांनी मुकुंदवाडी पोलिसांना कळवली. मुकुंदवाडी पोलीस आठ दिवसांपासून आरोपींचा शोध घेत होते. मात्र बालगृहातून दोन्ही बहिणींना घेऊन जाणाऱ्या नितीन रोकडे याने तेथील रजिस्टरमध्ये आपले नाव नितीन साळवे असे नमूद केल्याचे तपासात उघड झाले. शिवाय पत्ता केवळ मुकुंदवाडी असा दिला. तो वापरत असलेल्या मोबाईलमधील सीमकार्डही नितीन बावणे व्यक्तीच्या नावे होते. त्यामुळे रोकडे सापडत नव्हता. मात्र मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे, फौजदार बनसोडे आणि पोहेकॉ गावडे, सानप या कर्मचाऱ्यांनी आठ दिवस प्रयत्न करून बुधवारी रोकडे यास पकडले. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नितीन यास पोलिसांनी उचलल्याचे कळताच उषा फरार झाली आहे.

राजस्थान पोलिसांकडून निर्दयी मातेला अटक
स्वाती हिची विक्री केल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी तिची आई सुशीला हिला अटक केली आहे. सुशीला हीस अटक झाल्यापासून मुंबईतील दलाल पूजा फरार झालेली आहे. दरम्यान या कारवाईमुळे अर्पिता या ९ वर्षीय चिमुकलीचेही भविष्य वाचले आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या नितीन रोकडे यास २५ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्याचे पो.नि. बहुरे यांनी सांगितले.



स्वातीला विकले अडीच लाखांत
आरोपी उषा हिचे मुंबई, पुणे येथे सतत ये-जा असते. मुंबईतील पूजा हिच्यासोबत तिची ओळख आहे. पूजा हिने दहा-अकरा वर्षाच्या मुलीला देह व्यवसाय करणाऱ्या क्षेत्रात ग्राहकांकडून मोठी मागणी असते असे उषा हिला सांगितले. त्यामुळे स्वाती आणि अर्पिता यांची विक्री करून श्रीमंत होण्याचे स्वप्न उषाने सुशीलास दाखवले. सुशीलाही पैशाच्या लोभापोटी पोटच्या दोन्ही गोळ्यांची विक्री करण्यास तयार झाली आणि महिनाभरापूर्वी ते मुंबईत दोन्ही मुलींना विक्री करण्यासाठी पूजाच्या घरी घेऊन गेले. तेथे स्वाती हिची अडीच लाखांत पूजा हिला विक्री करण्यात आली. यावेळी तिच्याकडून पन्नास हजार रुपये तिने सुशीला आणि पूजाला दिले. उर्वरित रक्कम महिनाभरात मिळेल, त्यावेळी अर्पिता हिलाही खरेदी करते, असे पूजाने त्यांना सांगितले. स्वातीला त्यांच्याकडे सोपवून आरोपी अर्पितासह औरंगाबादला परतले.

Web Title: The 11-year-old girl who was sold by her mother and mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.