वायू प्रदूषणामुळे दरवर्षी १ लाख १० हजार मृत्यू
By admin | Published: November 9, 2016 03:40 AM2016-11-09T03:40:57+5:302016-11-09T03:40:57+5:30
गेल्या पाच वर्षांमध्ये हवेतील वाढते प्रदूषण व वाढत्या धूम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे.
मीरा रोड : गेल्या पाच वर्षांमध्ये हवेतील वाढते प्रदूषण व वाढत्या धूम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. २००९ मध्ये ६५ हजार लोक भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाने मरण पडले होते तर २०१५ साली १ लाख १० हजार लोक मरण पावले, अशी माहिती चेस्ट रिसर्च फाऊंडेशननी दिली आहे.
फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे दरवर्षी जगभरात १६ लाख लोक मृत्यूमुखी पडतात. प्रदूषण रोखण्यात अशीच हयगय सुरु राहिली तर २०५० मध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या ६६ लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज ब्रिटीश नियतकालिक ‘नेचर’ने वर्तवला आहे.
सध्या भारताची राजधानी दिल्लीतील जनजीवन प्रदूषणामुळे विस्कळीत झाले आहे. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी आॅफ लंग कॅन्सर या संस्थेमार्फत नोव्हेंबर महिना जगभर फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. वाहनांमधील धुरामुळे होणारे प्रदूषण हा संपूर्ण जगामध्ये चिंतेचा विषय बनला आहे. या धुरामुळे श्वसनाचे रोग, टी.बी सारखे दुर्धर रोग होतात हे आपण आजवर ऐकले होते, पण स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगासारखा असाध्य रोग होतो, असे अमेरिकेतील संशोधनातील निष्कर्ष आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या कर्करोग सल्लागार डॉ. उमा डांगी म्हणाल्या की, जळणासाठी वापरले जाणारे रॉकेल, लाकूड, पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचा धूर तसेच फटाक्यांचा आणि कारखान्यातून सोडला जाणारा धूर, प्रदूषित वायू, धूळ, दूषित गॅस, स्वयंपाकघरातील कोंडला गेलेला धूर, विडी व सिगारेट जाळल्यामुळे होणारा धूर तसेच शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा व मूत्र यातून उत्सर्जित होणारा अमोनिया हे घटक मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित करीत आहेत. हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसनसंस्थेला पहिला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग जडण्यासाठी श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. एका पाहणीनुसार फुफ्फुसाचा कर्करोग ९० टक्के रु ग्णांना धूम्रपानामुळे होतो. हल्ली धूम्रपानाची लोकप्रियता वाढत असून महिलाही या व्यसनाला बळी पडत आहेत. गेल्या वर्षी १२ जूनला डब्ल्यूएचओच्या कर्करोग विषयक अभ्यास करणाऱ्या विभागाने वाहन प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो असे जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)