११० एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 03:33 PM2018-03-25T15:33:34+5:302018-03-25T15:33:46+5:30
कर्मचारी मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले आहेत. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कन्नड आगारापाठोपाठ रविवारी औरंगाबाद येथील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील ११० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी राज्यपाल , मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे. यासंदर्भात कार्यशाळा व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, जानेवारी २०१७ मध्ये एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे, करारपद्धत रद्द करून आयोगाप्रमाणे वेतन रचना करणे आदीसंदर्भात निवेदन देण्यात आले, परंतु वर्ष उलटूनही प्रतिसाद मिळाला नाही. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असताना मिळणार पगार अत्यंत कमी आहे. या पगारात घर चालवू शकत नाही. आजघडीला ९० टक्के कर्मचारी कर्जबाजारी आहेत. वारंवार निवेदन देऊनही प्रतिसाद मिळत नाही.
संघटना कामगारांना न्याय मिळवून देण्यात कुचकामी ठरल्या आहेत. कर्मचारी मानसिक, आर्थिकदृष्ट्या दुरबल झाले आहेत. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. निवेदनासोबत ११० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीने पत्र जोडण्यात आले आहे